scorecardresearch

Premium

“अमोल मिटकरी, तुमच्या रक्तातील पुरोगामी विचार रेशीमबागेत गहाण ठेवून…”, सामाजिक कार्यकर्त्याचे परखड पत्र व्हायरल

अरसोड यांचे हे पत्र चांगलेच व्हायरल झाले असून अमोल मिटकरी यांच्यावर पुरोगामी चळवळीतील सर्व स्तरातून टीका होत आहे.

Social worker letter to Amol Mitkari
"अमोल मिटकरी, तुमच्या रक्तातील पुरोगामी विचार रेशीमबागेत गहाण ठेवून…", सामाजिक कार्यकर्त्याचे परखड पत्र व्हायरल (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

यवतमाळ : आपल्या अमोघ वक्तृत्वाने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचे आमदार झालेले मुळचे विदर्भातील अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांचा हात पकडला. मिटकरी यांच्या या निर्णयाने पुरोगामी चळवळीसह शिव परिवारातही नाराजी आहे. नेर येथील सामाजिक तथा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते संतोष अरसोड यांनी आमदार अमोल मिटकरी यांना फटकरणारे पत्र लिहून ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. अरसोड यांचे हे पत्र चांगलेच व्हायरल झाले असून अमोल मिटकरी यांच्यावर पुरोगामी चळवळीतील सर्व स्तरातून टीका होत आहे.

अमोल मिटकरी हे २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. त्यांची भाषणे ऐकून अजित पवार प्रभावित झाले आणि त्यांनी मिटकरी यांना आमदार करण्याचा शब्द दिला होता व तो त्यांनी पाळला असे सांगितले जाते. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कुटासा हे मिटकरी यांचे गाव आहे.

Ajit Pawar vs Rohit Pawar
“आत्मक्लेश करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाणांच्या छायाचित्रासमोर बसा!”, रोहित पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
Beena Johnson, general secretary, the National Campaign on Dalit Human Rights, First Dalit Woman, Address, UN General Assembly, Dalit
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भाषण करणारी पहिली दलित कार्यकर्ती…बीना जॉन्सन
What Nitin Gadkari Said?
“फुकट मदत केली लोकांना वाटतं, हा मंत्री आहे याच्याकडे हरामाचा पैसा…”; नितीन गडकरींचं वक्तव्य
MLA Shashikant Shinde comment on Sharad Pawar
सातारा : निष्ठेपायी अपात्र झालो तरी पर्वा नाही – शशिकांत शिंदे

हेही वाचा – आपला मुलगा सुरक्षित शाळेत जात आहे काय? नागपुरात ७६२ ‘स्कूलबस’कडे योग्यता प्रमाणपत्र नाही

युवा अवस्थेत त्यांनी संभाजी ब्रिगेडमधून आपली कारकीर्द सुरू केली, तिथेच त्यांची वैचारिक जडण घडण झाली. राजकारणात येण्यापूर्वी मिटकरी कार्यक्रमांमधून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे आदित्य ठाकरे आदींची नक्कल करून टीका करायचे. राजकारणात आल्यानंतर त्यांनी राजकीय परिस्थितीनुरूप कलाटणी घेतली. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर मिटकरी यांनी अजित पवार यांना साथ दिली. मात्र त्याचवेळी त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर ‘आम्ही दादांसोबत’ असा डीपी ठेवताना त्यात शरद पवारांचेही छायाचित्र वापरल्याने शरद पवार समर्थक व पुरोगामी चळवळ, मराठा सेवा संघ परिवारात नाराजी व्यक्त होत आहे.

नेर येथील सामाजिक कार्यकर्ते, मुक्त पत्रकार, लेखक संतोष अरसोड मिटकरी यांना सडेतोडपणे लिहिलेल्या पत्रात म्हणतात, “शिवश्री आमदार अमोल मिटकरी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम! काल परवाच्या सत्ता नाट्यात तुम्ही एका वाहिनीसमोर बोलताना खूप हसत होते. बरं वाटलं असं हसताना पाहून. भक्त तर खूप हसत होते. राजकारणात भूमिका वगैरे काही महत्त्वाची नसते. महत्त्वाची असते ती लाचारी. मराठा सेवा संघाच्या चळवळीत तुमची जडणघडण झाली. साऱ्या महाराष्ट्रात तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली. अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांनी खास करून बौद्ध बांधवांनी तुम्हाला डोक्यावर घेतले.

मात्र बौद्ध बांधव तुमचे बोलघेवडेपण ओळखून चुकले आहे. आमच्या मंचावर येवून आम्हाला फुले-आंबेडकर शिकवणारा हा कोण? अशी त्यांची भावना आहे. तुम्ही खूप घसा कोरडा होईपर्यंत खिसाभर मानधन घेतले असे कार्यकर्ते बोलतात. या टोकदार वक्तृत्वामुळे तुम्ही अचानक आमदार झाला. चळवळीतील एक कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आमदार झाला याचा अनेकांना आनंद होता. पण आमदारकी आपल्या डोक्यात घुसली हे राष्ट्रवादीचे अनेकजण खासगीत बोलतात. फोन उचलायला स्वीय सचिव ठेवला, तेव्हा मूळचा अमोल मिटकरी कुठे गेला, हा प्रश्न अनेकांच्या डोक्यात घर करू लागला.

संभाजी ब्रिगेडमधील अनेक कार्यकर्तेसुद्धा तुम्ही दूर केलेत. तुम्ही मोठ्या साहेबांविषयी किती आदराने बोलत होता. पण आता तुमची गोची झालीये. असो. खालल्या मिठाला जागावे लागेल. प्रवक्तेपद त्यासाठीच दिले आहे. तुम्ही जेव्हा टीव्हीवर गोडसे, सावरकर यांच्यावर जहरी टीका करत होता तेव्हा तुमच्यावर पुरोगामी लोकं खुश होते. गोपीचंद पडळकरांसोबत डिबेट होत होती तेव्हा भक्त तुम्हाला ‘मटणकरी’ म्हणत होते. आम्हाला खूप वाईट वाटत होते हे ऐकून. तुमचा तो समर्पयामीचा डायलॉग खूप फेमस झाला. सदैव फुले आंबेडकर तुमच्या ओठांवर होते. पण आता पुढे काय? या प्रश्नाने अनेकजण अस्वस्थ आहेत. भक्तपण खूप नाराज आहेत.

विचार महत्त्वाचा असतो, सत्ता नाही. एक अमोल खासदारकी सोडून देण्याचा निर्णय घेतो अन् दुसरा अमोल मात्र प्रसंगी टीव्हीसमोर हसतो अन् सत्तेला चिपकून राहतो. लय वाईट वाटते हो आमदार साहेब आता!

हेही वाचा – महाविद्यालयीन तरुणाने तलवारीने कापले दहा केक, भंडारा येथील घटना

पुढचा काळ तुम्हाला गोपीचंद पडळकरांसोबत घालवावा लागेल. वेळ प्रसंगी बागेश्र्वर बाबाच्या मंचावर जावे लागेल. ज्या देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही वैफल्यग्रस्त झाले असे म्हणत होता त्या देवेंद्र फडणवीस यांचे पाय धरावे लागेल. नियतीच्या मनात असले तर सावरकर जयंतीचे तुम्ही रेशीमबागेत प्रमुख वक्ते राहाल. मग सावरकरांचा विज्ञानवाद सांगून ते कसे स्वातंत्र्यवीर होते हे तुम्हाला सांगावं लागेलच. एखादेवेळी गोडसेचेपण समर्थन करावे लागेल.

यापुढे विश्वगुरू, उप विश्वगुरू यांची मिमिक्री करता येणार नाही तुम्हाला. कधी काळी पवार, ठाकरे यांची मिमिक्री केली. नंतर ती राजकीय स्वार्थातून बंद झाली. आता पुन्हा ती करावी लागली तर नवल वाटू नये. तुमच्या रक्तातील पुरोगामी विचार रेशीमबागेत गहाण ठेवून तुमची पुढली राजकीय वाटचाल कशी असेल, हे पाहणे मजेशीर ठरेल. फुले, शाहू, आंबेडकर अन् सोबत गोडसे, सावरकर, गोळवलकर हा नवा समरसतावादी विचार जर छगन भुजबळांच्या वैचारिक मदतीने तुम्ही जन्माला घातला तर खूप खूप उपकार होईल. अशा काळात तुम्हाला भक्त आणि पुरोगामी कसे स्वीकारतात याचे उत्तर सध्या तरी देता येणार नाही. तुमच्या भाषणासाठी सतरंज्या उचलणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची ही सात्विक भावना आहे”.

या व्हायरल पत्राने सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार समर्थक, मराठा सेवा संघ, अमोल मिटकरी समर्थकांच्या वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social worker letter to amol mitkari goes viral nrp 78 ssb

First published on: 08-07-2023 at 11:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×