वर्धा: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडलेत. या टप्प्यात प्रचार, सभा व मतदान आपल्या पक्षाच्या अनुकूल व्हावे म्हणून सर्वच पक्षनेत्यांनी खबरदारी घेतली होती. प्रामुख्याने भाजपने याची खास नियोजनच केले होते. आता हे दोन टप्पे पार पडल्यावर उर्वरित पाच टप्प्यासाठी मतदान होणार आहे. आता निवांत राहू, अशी मानसिकता ठेवून असणाऱ्या नेत्यांना भाजपने अधिक जबाबदारी देत कामाला लावले आहे. ते म्हणतात की आधीच मोठी जबाबदारी पार पडली. आता हे काय? पण, दिलेली जबाबदारी स्वीकारून ते कामावर निघाले आहेत. प्रदेश भाजपने विविध लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून आमदार व अन्य नेत्यांची नेमणूक केली. त्यात काहींना किनारी मतदारसंघ मिळाल्याने त्यांनी समाधान मानल्याचे कळते.
हेही वाचा : ‘आरटीई’च्या जागा २२,४११ अन् अर्ज अवघे १४२१… प्रवेश प्रक्रियेतील बदलांमुळे अमरावतीतील पालकांची…
आमदार डॉ. पंकज भोयर – अलिबाग, समीर कुणावर – पेण,प्रताप अडसड – महाड, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट – कुडाळ, रामदास आंबटकर – राजापूर , विकास कुंभारे – दापोली, कृष्णा खोपडे – गुहागर असे प्रचारासाठी विधानसभा क्षेत्र मिळाले आहे. राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांना उर्वरित लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय जबाबदारी मिळाली आहे. आम्ही सर्वच आज या क्षेत्रात पोहचणार, अशी माहिती सुनील गफाट यांनी दिली. खासदार रामदास तडस यांना उत्तर कराड मतदारसंघ देण्यात आला आहे. अन्य काही नेत्यांनी कौटुंबिक कारण देत ही जबाबदारी नाकारली, अशी माहिती जिल्हाध्यक्षांनी दिली. पण समुद्र किनारी जायला मिळणार म्हणून काही सुखावले, असेही चित्र आहे.