अमरावती : प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ हा आधारवड असतो. हा आधारवड चांगल्या- वाईट अनुभवाची शिदोरी घेऊन आयुष्याची संध्याकाळ सुखद राहावी यासाठी धडपडत असतो. मात्र अनेक कुटुंबात ज्येष्ठांना योग्य वागणूक मिळत नाही.

शासनाने ज्येष्ठांसाठी कायदा केला. त्याद्वारे ज्येष्ठांना अधिक खावटी मिळवण्‍याचा अधिकार आहे. मात्र तरीही ज्येष्ठांची होणारी परवड कायम आहे. त्‍यातच एका मुलाने वडिलांना खावटी द्यावी लागते, याचा राग मनात ठेवून त्‍यांची हत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना चांदूर बाजार पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील पिंपरी पूर्णा येथे आज शुक्रवारी घडली.

माणिक यशवंतराव सोसे (७५, रा. पिंपरी पूर्णा) असे मृताचे तर महेश माणिक सोसे (४०, रा. पिंपरी पूर्णा) असे आरोपी मुलाचे नाव आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्यात आज फिर्यादी गोपाल माणिक सोसे यांनी तक्रार दिली की, फिर्यादी व त्याचा लहान भाऊ महेश माणिक सोसे यांच्याविरुद्ध त्यांचे वडील माणिक सोसे यांनी न्यायालयात उदरनिर्वाहासाठी खावटीचे प्रकरण दाखल केले आहे. सदर प्रकरणात दोघांनी खावटीची रक्कम न भरल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट काढला होता.

त्यानंतर गोपाल आणि महेश या दोन्ही भावांनी खावटीची रक्कम न्यायालयात भरली होती. या गोष्टीचा राग मनात धरून महेश याने आज वडिलांसोबत वाद घातला. महेशने संतापाच्या भरात त्यांच्या वडिलांच्या डोक्यावर पाईपने वार केले, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. खावटीच्या रकमेसाठी आपल्या मुलांच्या विरोधात वडील न्यायालयात गेले, याचा राग महेशच्या मनात होता. आज वादाची ठिणगी पडली आणि महेशने आपल्या जन्मदात्यालाच संपविले.

तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी महेश सोसे याच्या विरुद्ध चांदूर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काय आहे कायदा ?

ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचे मुले वागवत नाहीत, त्यांचे संगोपन करीत नाहीत अशांवर शासनाने अंकुश बसावा यासाठी २००७ मध्ये ज्येष्ठ नागरिक कायद्याची निर्मिती केली. तो २०१० पासून अमलात आणला. या अंतर्गत संगोपन न करणाऱ्या, उतारवयात मुलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांच्या विरोधात तक्रार देवून न्याय मिळविण्याचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांना या कायद्यान्वये दिला आहे.

यासाठी संबंधित पीडित ज्येष्ठांनी तक्रार केल्यास मुलांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते. आई-वडिलांना उतार वयात सांभाळणे कायद्यान्वये कसे बंधनकारक आहे हे सांगितले जाते. मात्र तरीही मुलाने न ऐकल्यास त्याला खावटी स्वरूपात ठरावीक रक्कम द्यावी लागते.