नागपूर : मंदिरांवर भोंगे लावायला आमची हरकत नाही. मात्र, मशिदींवरील भोंगे काढण्याला आमचा विरोध असून आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू. एका बाजूला भोंगे, तर दुसऱ्या बाजूला सोंगे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली.
रामदास आठवले नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांना राजकारणात यश मिळत नाही, त्यामुळे ते उलट-सुलट असे मुद्दे उपस्थित करत असतात. त्यांची ती सवयच आहे. त्यांनी कठोर हिंदुत्वाची भूमिका घेतली असली तरी ती बाळासाहेबांना मान्य नव्हती. राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. मात्र, अशी विधाने करून राज्यातील वातावरण दूषित करण्याचे काम केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भाजपने भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारचा भोंगे काढण्याला पाठिंबा नाही, असे आठवले यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी जाती-धर्मामध्ये भांडणे होतील, अशी विधाने करू नयेत. त्यांनी अनेकवेळी आपली भूमिका बदलली आहे. ते मोठे नेते आहेत, पण देशात लोकशाही आहे, पेशवाई नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. तुम्हाला भोंगे लावायचे असेल तर लावा, मात्र मशिदींवरील भोंगे उतरवले जाणार नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील एखाद्या मुख्य सहकारी पक्षाने पाठिंबा काढला तर हे सरकार नक्कीच पडेल. सध्या तशी परिस्थिती नसली तरी तशी शक्यता नाकारता येत नाही. सरकार पडलेच तर सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चांगले निर्णय घेतले जात आहे आणि जनता मोदींच्या पाठीशी आहे. त्यामुळे २०२४ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रामध्ये पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.