नागपूर : पंधरा महिन्यांच्या ‘विहान’ला स्पाइनल मस्क्युलर ट्रोफी (एसएमए) या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. त्यावर १६ कोटींचे झोलगेनस्मा इंजेक्शन हाच उपचार आहे. त्याचे वडील डॉ. विक्रांत अकुलवार हे हा मोठा निधी जमवण्यासाठी धडपडत आहेत. आतापर्यंत अडीच कोटी रुपये गोळा झाले आहेत. परंतु लक्ष्य अद्याप लांबच असल्याने मदतीसाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. आकुलवार यांनी केले आहे.
डॉ. विक्रांत आकुलवार हे मेडिकलच्या शल्यक्रिया विभागात अधिव्याख्याता तर आई पॅथॉलॉजिस्ट आहे. याबाबत बोलताना डॉ. आकुलवार म्हणाले, कमी कालावधीत हा निधी उभारण्यासाठी इम्पॅक्ट गुरूच्या मदतीने क्राऊड फंडिंग सुरू केले आहे. विहानसाठी आम्हाला समाजाच्या उदार पाठिंब्याची गरज आहे.
या विकाराचे निदान झालेल्या बऱ्याच मुलांसाठी क्राऊड फंडिंगद्वारे निधी उभारला गेला. त्यांना झोलगेनस्मा इंजेक्शन दिल्यावर ते बरे झाले. त्यामुळे लवकरात लवकर मुलाला हे इंजेक्शन मिळवून देण्यासाठी समाज माध्यमावर एक मोहीमही चालवली जात आहे. अधिक माहितीसाठी https://www.impactguru.com/fundraiser/help-vihaan-akulwar या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. आकुलवार यांनी केले.
असे झाले निदान..
विहानमध्ये हळूहळू स्नायू कमकुवत आणि निकामी करणाऱ्या एसएमए विकाराचे निदान झाले. या आजारात मुलाला रांगणे, बसणे आणि चालण्यात अडचणी येतात. जन्मानंतर सुरवातीला आठ महिने विहानच्या पायात कमी हालचाली होत्या. परंतु नंतर त्या आणखी कमी झाल्या. वैद्यकीय चाचणीत या आजाराचे निदान झाले. सध्या बेंगळुरूच्या बॅप्टिस्ट रुग्णालयातील डॉ. मॅथ्यू हे विहानवर उपचार करत आहेत.