नागपूरः रमी खेळतांनाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यावर मानिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद काढून घेतले गेले होते. त्यांनी नुकतीच क्रीडामंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली. त्यानंतर मानिकराव कोकाटे शनिवारी प्रथमच नागपुरात बुद्धीबळ विश्वविजेची दिव्या देशमुख यांच्या सत्कार समारंभाला हजर झाले होते. क्रीडामंत्री म्हणून या समारंभात कोकाटे यांनी केलेले वक्तव्य पून्हा चर्चेत आले आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
क्रीडामंत्री मानिकराव कोकाटे म्हणाले, आजचा दिवसा दिव्या देशमुख हिच्या कष्टाचा गौरव करणारा आहे. दिव्याने महाराष्ट्र आणि देशाचे नाव मोठे केले, ती केवळ भारताची कन्या नाही तर महाराष्ट्राची मृदूलता आहे. आज मी दिव्याचे आई-वडील आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो. मुलीला संधी दिली तर त्या जग जिंकू शकतात हेच दिव्याने दाखवून दिले आहे. क्रीडा क्षेत्रात मुलींसाठी विशेष योजना आणू, दिव्यासारखे अनेक खेळाडू घडावे अशी इच्छा व्यक्त करत माणिकराव कोकाटे यांनी दिव्या तुझ्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे, असे आश्वासन दिव्याला दिले.
दरम्यान, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमचा क्रीडा विभाग अग्रेसर असेल, मुख्यमंत्र्याच्या आदेशाने मी प्रयत्नाची पराकाष्टा करेल. महाराष्ट्राचा क्रीडामंत्री म्हणून आज माझा पहिला कार्यक्रम असल्याचेही कोकाटे यांनी म्हटले. दरम्यान कृषीमंत्री असतांना रम्मीचा वाद उद्भवल्यावर कोकाटे क्रीडा मंत्री म्हणून नागपुरातील पहिल्याच जाहिर कार्यक्रमाला हजर होते. यावेळी कोकाटे काय बोलणार? याकडे सगळ्याच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले होते.
मानिकराव कोकाटे यांचा वाद काय ?
आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरुन त्यावेळचे कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत कोकाटे हे सभागृहात बसलेले असताना मोबाईलवर जंगली रम्मी खेळत असल्याचे पाहायला मिळत होते. या व्हिडीओला रोहित पवारांनी कॅप्शन देत जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…! असे म्हटले होते. दरम्यान “सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?” असा सवाल रोहित पवारांनी विचारला होता. त्यानंतर वाद उफाळून कोकाटे यांना कृषीमंत्रीपद गमवावे लागले होते.