जिल्हा परिषदेत महिलांचे राज्य

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी सुमित्रा कुंभारे यांची बहुमताने निवड झाली.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी सुमित्रा कुंभारे यांची बहुमताने निवड झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार कैलास बरबटे यांना केवळ १३ मते पडली. काँग्रेसने जि.प.च्या अध्यक्षपदी रश्मी बर्वे यांची निवड केल्यानंतर प्रथमच उपाध्यक्षपदही महिला सदस्याला दिले असून तापेश्वर वैद्य वगळता जि.प.मध्ये खऱ्या अर्थाने महिला राज आले आहे.

 जि.प.च्या सभागृहात सकाळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत सुमित्रा कुंभारे यांनी तर भाजपकडून कैलास बरबटे यांनी उमेदवारी अर्ज भरला. सदस्यांनी हात उंच करून मतदान केले. यात भाजपच्या उमेदवाराला १३ मते तर काँग्रेसच्या सुमित्रा कुंभारे यांना ४३ मते पडली. यात काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे ७, शिवसेना १, गोंडवाना गणतंत्र पार्टी १, शेकाप १ व अपक्ष १ सदस्यांचा समावेश होता.

यानंतर पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, नाना गावंडे, अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या उपस्थितीत कुंभारे यांनी पदग्रहण केले. २०२० रोजी   जि.प. उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारे यांची निवड झाली होती.

ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. यात मनोहर कुंभारे यांचाही समावेश होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने या १६ जागांचा खुल्या प्रवर्गात समावेश केला. त्यात कुंभारे यांचा सर्कल हा महिलांसाठी आरक्षित झाला. त्यांनी पत्नी सुमित्रा यांना उमेदवार देऊन त्या विजयी झाल्या. त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी ५८ पैकी ५६ सदस्यांनीच मतदान केले तर राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख व भाजपचे मोहन माकडे अनुपस्थित होते.

उपाध्यक्षपदी सुमित्रा कुंभारे

पक्षाने माझ्यावर उपाध्यक्षपदाबरोबरच आरोग्य व बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवली आहे. १०० टक्के लसीकरणाचे माझे उद्दिष्ट आहे. आरोग्य सेवा जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी व पांधण रस्त्याची कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.

-सुमित्रा कुंभारे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

विरोधी पक्ष गटनेतेपदी आतिश उमरे

जि.प.मध्ये विरोधी पक्ष गटनेतेपदी  आतिश उमरे व उपगटनेतपदी  व्यंकटजी कारेमोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. गटनेते पदासाठी भाजपकडून व्यंकट कारेमोरे यांच्या नावाची चर्चा असताना आणि पक्षांकडून त्यांचे नाव निश्चित झाले होते, मात्र शुक्रवारी सकाळी पक्षाच्या बैठकीत उमरे यांना गटनेतेपद देण्यात आले तर कारेमोरे यांना उपगटनेतेपद दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State women zilla parishad ysh