राखी चव्हाण,लोकसत्ता

नागपूर : प्रदूषण न करणाऱ्या इंधनाच्या अनुपलब्धतेमुळे नागपूर शहरातील झोपडपट्ट्यांमधील ४३ टक्के घरांमध्ये अजूनही चुलीचा वापर केला जात आहे. त्यामुळे ८१ टक्के महिलांना खोकल्याचा त्रास आहे.

तुलनेने प्रदूषण न करणाऱ्या इंधनाचा वापर करणाऱ्या फक्त २३ टक्के महिलांना खोकल्याचा त्रास आहे. चुलीचा वापर केल्यामुळे ६५ टक्के महिलांना डोळे चुरचुरण्याचा त्रास होत असून, त्या तुलनेत फक्त चूल न वापरणाऱ्या १८ टक्के महिलांनाच डोळे चुरचुरण्याचा त्रास आहे. “विमेन्स हेल्थ अँड वेल बिइंग, की इंडिकेटर ऑफ क्लीन एअर : इनसाईट फ्रॉम अ सर्व्हे ऑन बायोमास बर्निंग इन हाऊसहोल्ड ऑफ नागपूर, महाराष्ट्र”च्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. महिलांचे देशपातळीवर असलेले संपर्कजाळे “वॉरिअर मॉम्स” आणि “सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट नागपूर” यांनी हे सर्वेक्षण केले. प्रदूषण न करणारे इंधन पुरवणाऱ्या योजना उपलब्ध आहेत, पण याबाबत झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना माहितीच नाही, हे धक्कादायक वास्तवही या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.