महाराष्ट्र जाती जमाती कर्मचारी संघाकडून संपाचा इशारा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या वसतिगृह क्रमांक ५ मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप महाराष्ट्र जाती जमाती कर्मचारी संघाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे सध्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे परंतु अद्यापपावेतो कोणावरही कारवाई झाली नाही. दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास संपाचा इशारा कर्मचारी संघाच्या वतीने मेडिकल प्रशासनाला देण्यात आला आहे.
याबाबत कर्मचारी संघाने सांगितले की, वसतिगृह क्रमांक ५ मध्ये प्रथम वर्षांचे विद्यार्थी राहतात. येथे विविध कामे करण्याकरिता प्रशासनाकडून चतुर्थश्रेणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते येथे प्रामाणिकपणे नित्यनियमाने सेवा देतात. गेल्या काही दिवसांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना हे विद्यार्थी शिविगाळ व मारहाण करतात अशी तक्रार आहे. काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांकडून काही कर्मचाऱ्यांना खोलीत डांबून मारहाण करण्यात आली होती. मारहाण करतांना विद्यार्थ्यांकडून काही कर्मचाऱ्यांनाही बरोबर घेण्यात आल्याचे येथील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्या घटनेपासून मेडिकलमध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यासंबंधीची तक्रार कर्मचारी संघाने त्वरित अधिष्ठाता कार्यालयात केली होती परंतु त्यावरही काहीच कारवाई केली गेली नाही. म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.
हे विद्यार्थी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या इराद्याने वारंवार त्यांच्या अंगावर धावून जातात त्यामुळे केव्हाही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.