scorecardresearch

बारावी परीक्षेत गुणवत्तेचा बट्टय़ाबोळ! ; पालक शाळेचा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पथ्यावर; भरारी पथके पोहचलीच नाहीत

शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये परीक्षेदरम्यान मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची माहिती आहे.

(प्रातनिधिक छायाचित्र)

नागपूर : करोनाची खबरदारी म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रत्येक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र देत शुक्रवारपासून परीक्षेला सुरुवात केली. परंतु, विभागातील बहुतांश शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण परीक्षेचा बट्टय़ाबोळ झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी लेखी परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाच्या पेपरला विभागात दहा ते पंधरा कॉपीची प्रकरणे असताना यंदा पालक शाळांमध्येच परीक्षा असल्याने भरारी पथकांच्या दुर्लक्षामुळे गडचिरोलीमधील एक प्रकरण वगळता दुसरीकडे कुठेही कॉपीची प्रकरणे आढळली नसल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये परीक्षेदरम्यान मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची माहिती आहे.  इंग्रजी विषयाच्या पेपरने शुक्रवारी बारावी परीक्षेला सुरुवात झाली. करोनामुळे मागील वर्षी परीक्षा रद्द करून अंतर्गत गुणवत्तेचा आधार घेत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

यात ९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित करीत लेखी परीक्षाच व्हायला हवी अशी मागणी समोर आली. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा लेखी परीक्षेतच कस लागत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने यंदा शिक्षण मंडळाने लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. करोनाची खबरदारी म्हणून शाळेमध्येच परीक्षा केंद्र देण्यात आले. मात्र, शाळांनी या निर्णयाचा लाभ उचलत निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना  चांगलीच सवलत दिल्याचे चित्र होते.  अनेक ठिकाणी भरारी पथके पोहचलीच नाहीत.  इंग्रजीसारख्या विषयाच्या परीक्षेदरम्यान गडचिरोलीमध्ये गैरप्रकाराचे एकच प्रकरण आढळले. दरवर्षी लेखी परीक्षेदरम्यान इंग्रजीच्या पेपरमध्ये दहा ते पंधरा अशी प्रकरणे असताना यंदा एकच प्रकरण कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

परीक्षेच्या पहिल्या दिवशी ४७७ मुख्य तर १,०५९ उपकेंद्र अशा एकूण १,५३६ परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजता इंग्रजीचा पेपर सुरू झाला. परीक्षेसाठी विभागातून १ लाख ६० हजार ५१९ विद्यार्थ्यांची नोंदणी असून पहिल्या दिवशी १ लाख ३२ हजार विद्यार्थी पेपरला हजर होते.

प्रश्नपत्रिकेत चुका?

शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचना व प्रश्नपत्रिका प्रशिक्षणानुसार व्याकरणाच्या प्रश्नांना पर्याय देण्यात आलेला नाही. मुलाखतीच्या प्रश्नासाठी ‘टेबल’ आवश्यक असताना तो  नव्हता.  साधे वाक्य सोपे करण्यासाठी दिले होते. अपील लिहिण्याच्या सूचना अपूर्ण असल्याने त्या विद्यार्थ्यांना समजू शकल्या नाही. यामुळे विद्यार्थी गोंधळले, असा आक्षेप काही विषय शिक्षकांनी घेतला आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students copying in hsc exams in nagpur zws