scorecardresearch

सीमा तपासणी नाके बंद करण्याबाबत अभ्यासगट

केंद्र सरकारने २०२१ मध्ये राज्य शासनाला सूचना केल्यावरही राज्यातील सीमा तपासणी नाके बंद झाले नाहीत.

नागपूर : केंद्र सरकारने २०२१ मध्ये राज्य शासनाला सूचना केल्यावरही राज्यातील सीमा तपासणी नाके बंद झाले नाहीत. आता राज्य शासनाने हे नाके बंद करण्याबाबत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय अभ्यासगट तयार केला आहे. त्यांना तीन महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा आहे.
या अभ्यासगटात उपायुक्त (परिवहन) दिनकर मनवर, उपायुक्त (लेखा) तुळशीदास सोळंखी, उपायुक्त (परिवहन) राजेंद्र मदने, अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांचा समावेश आहे. या अभ्यासगटाला राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करण्याची कार्यपद्धती निश्चित करायची आहे. हे नाके बंद करायचे असतील तर नियमानुसार कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करावा, राज्य शासनावर त्याचा किती आर्थिक भार पडेल, याचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी अभ्यासगटावर सोपवण्यात आली आहे. शासनाला तीन महिन्यात अहवाल सादर करायचा आहे. त्यानंतर शासन या सीमा तपासणी नाक्याबाबत ठोस निर्णय घेईल. या विषयावर परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी
परिवहन विभागाकडून महाराष्ट्राच्या सीमा तपासणी नाक्यावर व्यावसायिक वाहने थांबवली जातात. परराज्यातून विविध वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून येथील अधिकारी त्रुटींवर बोट ठेवत अवैध वसुली करत असल्याच्या तक्रारी विविध सामाजिक संघटनांकडून अनेकदा केल्या जातात. त्यामुळे हे तपासणी नाके बंद करण्याबाबत शासन काय भूमिका घेणार, याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Study group closing border checkpoints central government amy

ताज्या बातम्या