अतिरिक्त पात्रतेसाठी विद्यार्थ्यांचा संत्र्यावर अभ्यास

कृषी मंत्रालयाच्या कौशल्य विकास परिषदेचा हा अभ्यासक्रम आहे. सीसीआरआयच्या परिसरात हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

संत्रा उत्पादकांना मात्र काहीच लाभ नाही

लिंबूवर्गीय फळांचे संशोधन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून संत्रा आणि तत्सम फळांचे उत्पादन वाढावे म्हणून सुरू करण्यात आलेल्या कौशल विकास योजनेपासून संत्रा उत्पादक दूर आहेत. मात्र, या अभ्यासक्रमाचा लाभ कृषी क्षेत्रातील पदवीधर नोकरीसाठी अतिरिक्त पात्रता म्हणून घेत आहेत.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेत (सीसीआरआय) सन २०१६-१७ पासून एक महिन्याचा (२०० तासांचा) कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाच्या कौशल्य विकास परिषदेचा हा अभ्यासक्रम आहे. सीसीआरआयच्या परिसरात हा अभ्यासक्रम शिकवला जातो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. गेल्या दोन वर्षांपासून सहा बॅच झाल्या आहेत. प्रत्येक बॅचमध्ये २० उमेदवारांना संधी दिली जाते. हा अभ्यासक्रम लिंबूवर्गीय तंत्रज्ञान अभियानात शेतकऱ्यांच्या गावी जाऊन दिलेल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाऐवजी राबवण्यात येत आहे. टीएमसीअंतर्गत सीसीआरआयची तज्ज्ञ मंडळी आणि कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतात जात होते. तो केवळ काही दिवसांचा कार्यक्रम होता. त्याऐवजी दोन वर्षांपासून कौशल्य विकास योजनेअंतर्गत एक महिन्याचा अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाला कृषी शाखेतील पदवीधर तसेच इतर पदवीधर प्राधान्य देत आहेत. त्यांच्यासाठी हा एक महिन्याचा अभ्यासक्रम म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी अतिरिक्त पात्रता होय. प्रत्यक्षात संत्रा उत्पादक या योजनेत सहभागी होताना दिसत नाहीत. जे शेतकरी सहभागी होत आहेत ते ६५ ते ७० या वयोगटातील आहेत. अभ्यासक्रमाला सुरुवात होते, त्या दिवशी २० उमेदवार असतात. अभ्यासक्रम संपायला येत असताना उमेदवारांची संख्या १२ ते १३ वर आलेली असते.

‘‘एक महिन्याचे संत्र्यावरील अभ्यासक्रम पूर्ण झाले. आता कापसावरील एक महिन्याच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी जाणार आहे. नोकरी मिळवताना विविध कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र अतिरिक्त पात्रता म्हणून कामात येतील.’’

– प्रशिक्षार्थी

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना टीएमसीअंतर्गत आधी एक दिवसाचे प्रशिक्षण त्यांच्या गावी जाऊन दिले जात होते. तो एक जनजागृती कार्यक्रम होता. आता एक महिन्यांचा अभ्यासक्रम (कौशल्य विकास) आयोजित केला जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. आतापर्यंत सहा बॅच झाल्या आहेत. यात कृषी पदवीधर, शेतकरी, कृषी अधिकारी सहभागी होऊ शकतात.

– डॉ. एम.एस लदानिया, संचालक, सीसीआरआय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Study students oranges for additional qualifications