नागपूर : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा १ जून ते १५ जुलैपर्यंत घेण्याच्या सूचना असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही परीक्षांचा निर्णय जाहीर केला नसल्याने आता प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. विद्यापीठ उन्हाळी परीक्षा आता काय पावसाळय़ात घेणार का, असा सवाल केला जात आहे.

विद्यापीठाद्वारे यापूर्वी परीक्षा मंडळाच्या बैठकीत ऑनलाईन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी कुलगुरूंच्या बैठकीत, ऑफलाईनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, याला वीस दिवसांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटून गेल्यावरही कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, १ जुन ते १५ जुलैदरम्यान परीक्षा घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार किमान महिन्याभरापूर्वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र, अद्याप कोणत्या स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार, हेच कळले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा साधारणत: मार्चमध्ये सुरू होत असून जूनच्या पहिल्या आठवडय़ात संपतात. त्यानुसार विद्यार्थी आणि पालक आपल्या कार्यक्रमांचे नियोजन करीत असतात. विद्यापीठाने यापूर्वी १५ मे पासून परीक्षा घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे पालकांनी आपले नियोजन तयार केले होते. मात्र, अद्याप परीक्षेबाबत निर्णय झाला नसल्याने हे सर्व नियोजन फसल्याचे दिसून येत आहे.