नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुख पदावरून सहायक पोलीस आयुक्त (सदर ) सुनीता मेश्राम यांची उचलबांगडी झाली. त्यांच्या पदाची जबाबदारी आता पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मेश्राम यांच्यासंबंधी झालेल्या तक्रारीवरून त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेल्याची चर्चा आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी सदर व सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. सुनीता मेश्राम यांना त्याचे प्रमुख बनविले होते. पण सुरुवातीपासूनच त्यांच्या कामावर आक्षेप होते. काही शाळा, संस्था चालकांनी पोलिस आयुक्तांची भेट घेवून या प्रकरणातील अर्थपूर्ण व्यवहाराची तक्रार केली.
पोलिस आयुक्तांनी यावर नाराजी व्यक्त करून तपास पथकाला खडे बोल सुनावले. वरिष्ठांकडून नियमबाह्य प्रकार होत असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्याने त्यावर नाराजीही व्यक्त केली होती. या घडमोडीत पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक प्रमुखांना बोलावून कानउघडणी करताना अवैध कारवाई टाळण्याचे खरमरीत पत्र दिले. त्यानंतर तडकाफडकी मेश्राम यांना तपास पथक प्रमुख पदावरून हटविण्यात आले. ही जबाबदारी आता राहुल मदने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तायडे यांची पोलिस उपायुक्त स्तरावर चौकशी करण्याचे आदेशही पोलिस आयुक्तांनी दिल्याची माहिती मिळत आहे.