करोनाची साथ नियंत्रणात यावी म्हणून लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मागील दीड महिन्यापासून उद्योग-व्यवसाय-बाजारपेठा, सार्वजनिक वाहतुकीसह इतरही छोटी-मोठी दुकाने बंद आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला. व्यावसायिकांनाही कोटय़वधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. अशा निराशेच्या वातावरणात काही सकारात्मक चित्रही करोनामुळेच निर्माण झाले आहे.

हजारो स्थलांतरितांना सोडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खासगी बसेसचा वापर करण्यात आल्याने बंद पडलेल्या या व्यवसायाला किंचित का होईना दिलासा मिळाला आहे. तर गोरगरिबांना मदत म्हणून वाटप करण्यात येत असलेल्या वस्तूंच्या किट्स तयार करण्याच्या कामातूनही  मोठय़ा प्रमाणात कामगारांना काम मिळाले आहे.

करोनामुळे १८ मार्चपासून टाळेबंदी लागली ती अद्याप कायम आहे. तेव्हापासून सर्वच बाजारपेठा बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद सोडला तर इतर एकही दुकान सुरू नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात लोकांचा रोजगार गेला. आंतरजिल्हा वाहतूक बंद असल्याने कोटय़वधीची उलाढाल असलेला खासगी बसेसचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांना कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, स्थलांतरित मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. सध्या त्यांना त्यांच्या गावी सोडण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर सोपवली असून तीन रेल्वे गाडय़ांच्या माध्यमातून काही मजूर गेले. मात्र छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा या राज्यातील मजुरांना खासगी बसेसच्या माध्यमातून सोडण्याचा निर्णय झाला. नागपूर जिल्ह्य़ात अडकलेल्या मजुरांना सोडण्यासाठी दोन दिवसापूर्वी २० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा खर्च मध्यप्रदेश सरकारने दिला होता. तत्पूर्वी पोलिसांनी ५० बसेसच्या माध्यमातून १५०० वर मजुरांना मध्यप्रदेशात सोडले आहे.

दरम्यान, नागपूर शहरात दररोज दोन ते अडीच लाख लोकांना विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप केले जाते. महापालिकेकडून विलगीकरण केंद्रातील संशयितांसाठी रोज दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली असून किट्स तयार करण्यासाठी महिलांच्या हातांना काम मिळाले आहे. डबे पोहचवण्यासाठी मुलांची मदत घेतली जात असून त्यांच्याही हाताला काम मिळाले आहे. शहरातील एका बडय़ा कंत्राटदाराला एका राजकीय पक्षासाठी संच तयार करून देण्याचे काम देण्यात आले आहे. यातूनही मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.

एस.टी.च्या साठ बसेसद्वारे रविवारी स्थलांतरित मजुरांना पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली तर विविध विलगीकरण केंद्रात नागरिकांना हलवण्यासाठी ४० स्टार बसेसची मदत घेतली जात आहे. ही सेवा नि:शुल्क असली तरी या निमित्ताने कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची संधी मिळाली आहे.

जिल्ह्य़ातून मूळगावी गेलेले परप्रांतीय

काटोल,(२४) नरखेड,(३) सावनेर (२८), कळमेश्वर (३९), मौदा (३०), कामठी (७६), नागपूर ग्रामीण (३०), हिंगणा (६४), उमरेड (६३), कुही (९८), भिवापूर (५८) ,नागपूर शहर (२२)

विविध वस्त्यांमध्ये गोरगरिबांना संस्थेतर्फे अन्नाचे पाकीट वाटप केले जाते. यामधून साठ जणांना काम मिळाले आहे. काही मुलांचीही मदत घेण्यात आली आहे.’’

– प्रमोद पेंडके, सचिव ‘मैत्री’ परिवार