पक्षाच्या कारवाईला न जमुनता काँग्रेसच्या सात विद्यमान नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवकांसह २३ जणांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारून अपक्ष किंवा इतर पक्षांकडून उमेदवारी घेतली, त्या सर्वाना तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध काँग्रेस सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करणार आहे.
शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी गुरुवारी बैठक घेतली. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी सुमारे २३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पक्षाचे विद्यमान सात नगरसेवक, दोन माजी नगरसेवक आणि शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी आहेत. तसेच निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक किशोर डोरले आणि श्रावण खापेकर यांच्यावरही निलंबन करण्याची कारवाई केली जाणार आहे.
काँग्रेसने विद्यमान १३ नगरसेकांना उमेदवारी नाकारली. उमेदवारी मिळू न शकल्याने राष्ट्रवादी आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी निवडणूक रिंगणात आहेत. सतीश चतुर्वेदी गटाचे नगरसेवक दीपक कापसे यांना प्रभाग क्रमांक ३० मधून काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. नगरसेवक महेंद्र बोरकर यांनी प्रभाग क्रमांक १ मध्ये बंडखोरी केली असून ते अपक्ष निवडणूक लढत आहेत. प्रभाग क्रमांक ११ मध्ये अरुण डवरे यांनी अपक्ष म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल झालेले नगरसेवक श्रावण खापेकर यांनी प्रभाग क्रमांक २० मधून बंडखोरी केली आहे. काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक पुष्पा निमजे यांचे पती नागेश निमजे यांनी प्रभाग क्रमांक २० मधून अपक्ष लढवत काँग्रेसला धडा शिकवण्याचे निर्णय घेतला आहे. नगरसेविका कुमुदिनी कैकाडे यांनी प्रभाग क्रमांक २५ मधून अपक्ष उमेदवारांची पॅनल तयार केले आहे.
या प्रभागात कुमुदिनी आणि त्यांचे पती श्रीकांत कैकाडे यांच्यासह अन्य दोन उमेदवार काँग्रेसला आव्हान देत आहेत. प्रभाग क्रमांक २३ मध्ये देखील नगरसेविका विद्या लोणारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उडी घेतली आहे. याशिवाय माजी नगरसेवक हिरा गेडाम, जेनिका कुंगवानी, कुसुम घाटे, रमेश घाटोळे, दुर्गेश कौरती हे राष्ट्रवादीच्या घडय़ाळ चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत.