कचरा उचलण्याच्या कामाचे खासगीकरण केल्यानंतरही परिस्थिती सुधारण्याऐवजी वाईटच होत चालल्याने खासगीकरणाच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, असा मतप्रवाह महापालिकेत आहे.

खासगी कंपनीच्या दिमतीला महापालिकेचे कर्मचारी असतात. कचऱ्यावरील टीका नगरसेवक आणि अधिकारी सहन करतात. आंदोलनही त्यांच्या विरोधात होतात. मात्र, कचरा उचलण्यासाठी कोटय़वधी रुपये घेणारी कंपनी यात कुठेच नसते. पूर्वी महापालिकेचाच आरोग्य विभाग शहर स्वच्छता करीत होता. त्यांच्याचकडे हे काम दिल्यास या कामावर महापालिकेचे नियंत्रण तर राहीलच शिवाय कचराही नियमित उचलला जाईल, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे.

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासोबत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कनक या खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आल्यानंतर महापालिकेने गेल्या पाच वर्षांत कंपनीला ८० कोटी आणि मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ दिले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याच्या विषयावरून कंपनीपेक्षा महापालिका लोकांच्या टीकेचे लक्ष्य ठरली असून आता पुन्हा नव्याने दोन कंपन्यांना कचऱ्याचे कंत्राट दिले जाणार आहे.  २०१२ मध्ये कनक कंपनीला कचरा उचलण्याचे काम देण्यात आले.  मात्र, शहरात कचरा वाढत गेला. तो उचलला जात नाही. दुसरीकडे कंपनी मात्र आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाली. दुसरीकडे कचऱ्यांच्या प्रश्नावर नगरसेवकांवर नागरिक संताप व्यक्त करू लागले. महापालिकेचे अधिकारी नगरसेवकांच्या टीकेला तोंड देऊ लागले. मात्र कंपनी यापासून  दूरच राहिली.

गेल्यावर्षी कनकचा करार संपुष्टात आला. त्यानंतर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंपनीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. आता दोन नव्या कंपन्यांच्या माध्यमातून शहर स्वच्छतेचे महापालिकेचे नियोजन आहे.

शहर स्वच्छतेचे काम पूर्वी महापालिकेचा स्वच्छता विभागच करीत होता. या विभागाकडे  आठ हजार सफाई कर्मचारी आहेत. शिवाय कचरा उचलण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा आहे. कर्मचाऱ्यांना संपूर्ण शहराची माहिती आहे. त्यांच्याकडूनच काम करून घेतले तर खासगी कंपन्यांच्या तुलनेत अधिक शहर स्वच्छ राखता येईल. शिवाय हे कर्मचारी महापालिकेच्या अखत्यारित येत असल्याने त्यांची जबाबदारीही निश्चित आहे. खासगी कंपन्यांचे असे नाही. ते महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सेवा घेतात. मात्र, नाव कंपन्यांचे होते.

गेल्या सहा वर्षांत खासगी कंपन्यांवर १३३ कोटी रुपये खर्च केले. एवढीच रक्कम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर खर्च केली असती तर शहर आणखी स्वच्छ झाले असते असे नगरसेवकांचेच म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कनककडे कचऱ्याची उचल आणि तो भांडेवाडीमध्ये साठवणूक एवढेच काम आहे. महापालिकेचे त्यावर नियंत्रण होते.  खासगी कंपनीला काम देण्याचा निर्णय प्रशासनाचा होता. नव्याने लवकरच नवीन दोन कंपन्याना काम देण्यात येणार असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे. ’’    – सुनील कांबळे आरोग्य अधिकारी (स्वच्छता), महापालिका