स्वामी विवेकानंद स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

लोकार्पणासाठी पंतप्रधान येणार

लोकार्पणासाठी पंतप्रधान येणार

अंबाझरी ओव्हर फ्लो परिसरात प्रस्तावित असलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असून तेथील ‘ओव्हर फ्लो कॅनल’च्या कामाच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे शहरातील विकास कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी सत्ताधाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या स्मारकांचे काम नोव्हेंबपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता बघता त्याच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजप प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची चर्चा आहे.

अंबाझरी ओव्हर फ्लो परिसरात स्वामी विवेकानंदाचे स्मारक तयार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या कार्यकाळात आल्यानंतर २०१६ मध्ये हे स्मारक पूर्ण होणार आहे. स्वामी विवेकानंदाचा पुतळा उभारण्यात आला असून त्या ठिकाणी ‘लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो’ची निर्मिती केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण व्हावे, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून त्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्या संदर्भातील कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे स्थायी समिती अघ्यक्ष सुधीर राऊत यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंद स्मारकाच्या सभोवताल ‘ओव्हर फ्लो कॅनल’ तयार करण्यात येत आहे. यासाठी चार निविदा आल्या होत्या, परंतु यातील दोन निविदाकार अपात्र ठरल्याने उरलेल्या दोघांमध्ये स्पर्धा होऊ शकली नाही. परिणामी, फेरनिविदा काढण्यात आली. यात एकच कंत्राटदाराची निविदा आली. दरम्यान, फेरनिविदेला पहिल्या निविदेतील मेसर्स आर्यमा इन्फ्रास्ट्रक्चरने न्यायालयात आव्हान दिले. यामुळे स्वामी विवेकानंद स्मारकाचे काम रखडण्याची भीती व्यक्त करत स्थायी समितीने बाहेरच तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने प्रक्रिया केली. त्यामुळे आर्यमा इन्फ्रास्ट्रक्चरची निविदा स्थायी समितीने मंजूर केली.

जेट पॅचरने खड्डे बुजविणाऱ्या अंजनी लॉजिस्टिकच्या मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाला परत पाठविला आहे. मूळ अटी बदलवून हा प्रस्ताव सादर केला होता. याशिवाय ४०० कोटीचे सिमेंट रस्ते झाल्यानंतर जेटपॅचरची गरज किती राहील. हे तपासून पाहण्याचेही निर्देश प्रशासनाला दिले. इन्फास्टा पेंच करण्याचे प्रशासनाने सुचविले होते. मात्र याबाबत वेगळी निविदा आवश्यक असल्याचे मत राऊत यांनी नोंदविले. सिमेंट रोडच्या पॅकेज १ मधील काही रस्त्याची अभि. इंजिनिअरिंगच्या निविदेनुसार देण्याचा प्रस्ताव होता, परंतु स्थायी समितीने दोन अभि. इंजिनिअरिंगची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. आज स्थायी समितीने अभि. इंजिनिअरिंगच्या निविदेला मंजुरी दिली त्यामुळे पॅकेज १ व २ मधील सिमेंट रस्त्याचा मार्ग मोकळा झाला.

शुक्रवार तलाव परिसरात तयार होणारी खाऊ गल्लीसाठी सीसी टीव्ही आणि विद्युत व्यवस्था केली जात आहे. खाऊ गल्लीसाठी स्टील फ्रेमच्या स्ट्रक्चर उभारणीच्या कामाला लागणाऱ्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. लोकांची गर्दी होण्याची शक्यता बघता येथे सुलभ शौचालय, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि आकर्षक फाऊंटेन तयार करण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार.

– सुधीर राऊत, स्थायी समिती अघ्यक्ष

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swami vivekananda memorial work at final round

ताज्या बातम्या