पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यात अडचणी

नागपूर : राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी (एफवायजेसी सीईटी २०२१) आजपासून सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी नोंदणी करताना विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांक टाकल्यावर तेथे येणारी गुणपत्रिका आणि मूळ गुणपत्रिकेची जुळवाजुळव होत नसल्याने राज्य शिक्षण मंडळावर आता संकेतस्थळातच दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे.

अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु ती केवळ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी अर्थात ऐच्छिक परीक्षा असणार आहे. सीईटी २०२१ यंदा २१ ऑगस्टला घेण्यात येणार आहे.  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी निकालाच्या संकेतस्थळामध्ये प्रचंड तांत्रिक गोंधळ निर्माण झाला होता.   मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपल्या बैठक क्रमांकाची नोंद करायची होती. त्यानंतर परीक्षा द्यायची की नाही, असा पर्याय निवडायचा होता. मात्र, संकेतस्थळावर अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असता त्यांची मूळ गुणपत्रिका व संकेतस्थळावर देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेमध्ये फरक असल्याचे दिसून आले. तर काही विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचा प्रयत्न केला असता संकेतस्थळामध्ये अनेकदा ‘एरर’ येत असल्याने अर्जच करता आला नाही.

दुरुस्तीचे काम सुरू

सीईटीच्या संकेतस्थळामध्ये अनेक चुका दिसून आल्याने आता त्यातील तांत्रिक चुका दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. त्यामुळे संकेतस्थळाची योग्य तपासणी न करता मंडळाने अर्ज नोंदणीला सुरुवात कुठल्या आधारावर केली, असा सवालही उपस्थित केला जात आहे.