नागपूर : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्काराने हाती घेतलेले ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीता जामगडे यांच्याबाबत दरदिवशी नवीन माहिती समोर येत आहे. सुनीता पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर दहा दिवसांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तिला अमृतसर पोलिसांना सुपूर्द केले. ती आता नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. काही महिन्यांपूर्वी ती दिल्लीलासुद्धा जाऊन आली. तिला पैसे जमा झाल्यानंतर फिरायला जाण्याचा छंद आहे. ही महिला इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानातील एका इसमाच्या संपर्कात आली. तो अंगठ्यांमध्ये बसविण्यात येणाऱ्या खड्यांचा (क्रिस्टल स्टोन्स) व्यवसाय करतो.
इन्स्टाग्रामवरील त्याच्या चित्रफितीवर भाळून ती थेट पाकिस्तानला जायला निघाली होती. कारगिलजवळील हुंदरमन गावातून एलओसी पार करून ती पाकिस्तानात गेली होती. सुनीताला पाकिस्तानात गेल्यानंतर तिथल्या सुरक्षा रेंजर्सने ताब्यात घेतले आणि १० दिवसांच्या प्राथमिक चौकशीनंतर तिला भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या सुपूर्द करण्यात आले. अमृतसर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर नागपूर पोलिसांच्या पथकाने तिला गुरुवारी मध्यरात्री नागपूरला आणले. न्यायालयाने अटक करण्याची तातडीची परवानगी दिली. सुनीताविरोधात कपिल नगर पोलीस ठाण्यात ‘अधिकृत गुप्त माहिती कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता जामगडेच्या मोबाईलमधून आणि कागदपत्रांमधून (पासपोर्ट, आधार कार्ड) महत्त्वाची माहिती मिळाल्याने सायबर पोलिससुद्धा ठाणेदार सतीश आडे यांना मदत करीत आहेत. तिचा मोबाईल सध्या विश्लेषणासाठी सायबर युनिटकडे देण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत तिने सांगितले की, ती आपल्या १३ वर्षांच्या मुलासोबत कारगिलमध्ये बर्फ पाहण्यासाठी गेली होती. मात्र, तिचे पैसे संपल्यानंतर ती नोकरीच्या शोधात पाकिस्तानात गेली. पाकिस्तानातील एका हॉस्पिटलमध्ये तिने नोकरी करण्याचे ठरविले होते, अशी सुनीता पोलिसांना सांगत आहे.
सुनीता जामगडे (४३) या महिलेने नियंत्रण रेषा (एलओसी) पार करून पाकिस्तानात अनधिकृत प्रवेश केल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. चार वर्षांपूर्वी सुनीता भूतान आणि नेपाळला गेली होती, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सुनीता सध्या कपिलनगर पोलिसांच्या कोठडीत असून, ती पोलिसांना सहकार्य करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. कपिलनगरात राहणारी सुनीता जामगडे २०२१ मध्ये भूतानला गेली होती. त्यानंतर काही पैसे गोळा केल्यानंतर ती नेपाळला गेली. तेथे काही दिवस काम केल्यानंतर ती भारतात’ परतली.सुनीता ही थोडेफार पैसे जमा झाल्यावर रेल्वेने विनातिकीट प्रवास करायची. तसेच रस्त्याने जाणाऱ्यांनाही नेहमी लिफ्ट मागायची. सुनीताचा घटस्फोट झाला असून, तिच्या पतीचा टेलरिंगचा व्यवसाय होता. सध्या सुनीता मुलासह राहत आहे.