बुलढाणा: साप म्हटले की भल्याभल्यांची  गाळण उडते. जीवाचा थरकाप होतॊ. त्यात अजगर म्हटलं की  दुपटीने धडकी भरते. अश्या या धडकीचा अनुभव नजीकच्या सावळा गावातील हजारो रहिवासियांना आला. बरं एकदा नव्हे तर सलग दोन दिवस गावकऱ्यांना सहा सात  ते दहा फुटी अजगराने दर्शन  दिले.  बरं हे  दोन्ही अजगर

एकाच जागी आढळले. सावळा गावातील कैलास श्रीराम जगताप यांच्या गोठ्या जवळच हे दोन्ही अजगर आढळले. ३० ऑगस्ट रोजी दिसलेल्या अजगराची लांबी सुमारे ७ फूट होती.आज रविवारी,  ३१ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता आढळलेले अजगर दहा फूट लांब होते. ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ

वाजता गोठ्याजवळ संतोष राजपूत यांना एक मोठे धूड आढळून आले. आज रविवारी पहाटे चार वाजता डॉक्टर भानुदास  राजपूत यांना दहा फूट अजगराचे दर्शन झाले. यामुळे भयभीत झालेल्या सावळा वासियांची  सर्पमित्र श्रीराम रसाळ व त्याच्या सहकाऱ्यांनी भयमुक्त केले. तसेच या दोघा अजगरांना कौशल्य, अनुभव पणाला लावून जेरबंद करीत जीवदान दिले.

यामध्ये सर्पमित्र प्रथमेश शिरसाठ, वनविभागाचे वनपाल शेख, वनरक्षक गवई यांचा समावेश होता. सलग दोन दिवस गावात झालेल्या अजगराच्या दर्शनाने  सावळा वासी हादरले आहे.

अजगर वाड्यात घुसला!

दरम्यान आज ३१ ऑगस्ट २०२५ सकाळी सकाळी ६ मोताळा तालुक्यातील राजूर येथिल  एका वाड्यात अजगर घुसला. गावातील राम रोठे यांच्या वाड्या मध्ये  ६ ते ७ फूट लांबीचा अजगर शिरल्याचे एका महिलेने पहिले. यामुळे महिलेने आराडा ओरड  केल्यावर घरातील व शेजारील मंडळी तिथे जमा झाली. अजगराला पाहून आजूबाजुला भीतीचे वातावरण निर्माण झाले. वैभव राऊत, समीर पाटोळे, मंगेश रोठे, कृष्णा राऊत यांनी  हा साप अजगर असल्याची खात्री  केली.त्यानंतर त्यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ  यांना यांची माहिती दिली. रसाळ तातडीने राजूर येथे पोहचले त्यानंतर त्यांनी अजगर रेस्कु केला व गावातील लोकांना दिलासा मिळाला. अजगर बघण्यासाठी महिलांची आणि पुरुषांची मोठी गर्दी झाली. गावाकऱ्यांना भीतीमुक्त केल्याबद्धल मयूर राऊत ,प्रवीण खोटाळे , दिपक टाकसाळ ,ज्ञानेश्वर खंडागळे यांनी रसाळ यांचे आभार मानले.