अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्या दरम्यान आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राणा दाम्पत्याने गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले होते, पण पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र, कार्यकर्त्यांनी नजीकच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण केले. उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यासाठी त्यांना साडी-चोळीचा आहेर देणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी रोखले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सत्तेचा दुरूपयोग करत राणा दाम्पत्यावर खोटे गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात डांबले आणि हनुमान चालीसा पठणाला विरोध केला, त्यांचा आम्ही निषेध करतो, असे महिला कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी महिला आघाडीच्या समीक्षा गोटेफोडे, ज्योती सैरीसे, सीमा लवणकर, सारीका म्हाला, प्रेमा लव्हाळे, सुमती ढोके, वर्षा पकडे, लता अंबुलकर, वंदना जामनेकर, मंदा राऊत, प्रतिभा महाजन, संगीता काळबांडे आदी उपस्थित होत्या.