भाजपातील दिग्गज सुरक्षित वॉर्डाच्या शोधात; महापालिका निवडणूक
महापालिकेच्या निवडणुकीत चार वार्ड मिळून एक प्रभाग करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला असताना शहरातील विविध प्रभागात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाचे तिकीट कापले जाणार या चर्चेला सुरुवातही झाली आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील भाजपचे गड समजण्यात येणाऱ्या काही प्रभागातून पक्षाने त्याच भागातील स्थानिक उमेदवारांनाच संधी द्यावी, उमेदवार लादू नये, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे. बाहेरच्या प्रभागातील उमेदवार दिला तर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारीही पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी सुरू केल्याने बालेकि ल्ल्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या पक्षाचे काही वरिष्ठ इच्छुक नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीला सहा महिन्याचा कालावधी असला तरी शहरातील विविध प्रभागात चार वार्डाचा एक प्रभाग करणार असल्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नाही तर कधी नाही अशी मानसिकता ठेवत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळी चार वार्ड मिळून एक प्रभाग केल्याने भाजपच्या अनेक नगरसेवकांचे पत्ते कटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेजारच्या प्रभागातून उमेदवारी मिळते का म्हणून काही वरिष्ठ नगरसेवकांचे प्रयत्न सुरू झाले आहे. मध्य, पूर्व, दक्षिण- पश्चिम, पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील काही प्रभाग हे भाजपचे बालेकिल्ले असून त्या ठिकाणी हमखास निवडून येण्याची खात्री असल्यामुळे अशा प्रभागावर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यात मध्य नागपुरात किल्ला, इतवारी, दक्षिणामूर्ती, दक्षिण नागपुरात रेशीमबाग, हनुमाननगर, नंदनवन हे प्रभाग आहेत. तर नागपुरात पश्चिम आणि दक्षिण पश्चिम नागपुरात काही प्रभाग हे भाजपचे बालेकिल्ले मानले जाते. त्यात शिवाजीनगर, लक्ष्मीनगर, गांधीनगर, रामनगर, धरमपेठ, रामदासपेठ, धंतोली, प्रतापनगर या प्रभागांचा प्रामुख्याने समावेश होतो. या प्रभागामध्ये भाजपचा विजय हमखास मानला जातो. त्यामुळे अनेक बाहेरच्या नेत्यांचे लक्ष या प्रभागातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न असते. त्यातूनच गेल्या काही दिवसात मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. इच्छुकांची नावेही बाहेर येत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘आम्हाला स्थानिक उमेदवारच हवा’ असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मत विचारात घ्यायचे की नेत्यांची ‘सोय’ बघायची असा पेच कोअर कमिटीसमोर निर्माण झाला आहे.
कार्यकर्त्यांचे जाळे, विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कायम लोकसंपर्क असलेले भाजपचे काही गड अधिकाअधिक भक्कम होण्यास मदत झाली. त्यामुळेच वॉर्डाच्या बाहेरील नेत्यांची या प्रभागावर नजर पडली. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, त्यांनी आपल्या वार्डातील स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरला आहे. यासाठी वार्डामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीही सुरू झाल्या व त्यात सामूहिकपणे स्थानिक उमेदवारांची मागणी लावून धरण्यात आली. पक्षाच्या एका नेत्याने याला दुजोराही दिला आहे. आपल्या भागातील कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. प्रभाग रचनेत काही वॉर्डाचे संपुष्टात आलेले अस्तित्व आणि काही प्रभागात निर्माण होणाऱ्या आरक्षणामुळे काही वरिष्ठ नगरसेवकांवर बेघर होण्याची वेळ येऊ शकते. यामुळे भाजपातील अनेक दिग्गज सध्या सुरक्षित वॉर्डाच्या शोधात आहेत. या पाश्र्वभूमीवर शहरातील काही वॉर्डातील कार्यकर्त्यांनी केलेली मागणी महत्त्वाची ठरते. कार्यकर्त्यांना डावलणे हे आजच्या घडीला कुठल्याही पक्षासाठी अडचणीचे ठरणारे असल्याने पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bjp giant leaders searching secure ward in nagpur municipal election
First published on: 24-05-2016 at 04:18 IST