शेतक ऱ्यांना सल्ले देणाऱ्यांचे पीक फोफावले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षांनुवर्षे शेतकरी आत्महत्येसारखा विषय ऐरणीवर येत असताना शेतकऱ्यांना या दैन्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना शेती कशी करावी व कोणती करावी, असे वारेमाप सल्ले देणाऱ्या सल्लागारांचे पीक मोठय़ा प्रमाणात फोफावले आहे.

आज विदर्भातच नव्हे, तर देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गरिबी, नापिकी, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती ही जरी कारणे असली तरी शेतकऱ्याने शेतीतच अभावात राबावे, अशी चंगळवादी धोरणे राबवली जातात आणि त्याला सरकारचा पाठिंबा असल्यामुळेच शेती आणि शेतकरी नेहमी तोटय़ातच असलेला दिसतो. भारतातील शेतीवर आधारित लोकसंख्या जशी मोठी आहे तशीच कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांच्याकडे दोन, तीन, अर्धा एकर शेती असलेले शेतकरीच मोठय़ा संख्येने आहेत. असा शेतकरी त्याच्या परिस्थितीनुसार शेतीत काय पिकवायचे. हे ठरवत असतो. भारतीय शेतकऱ्यांच्या हातात शेती असली तरी निसर्गाचा लहरीपणा, बाजारपेठ नियंत्रण, आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीचे नियंत्रण त्याच्या हातात नाही. शेती पिकली तरी आणि नाही पिकली तरी शेतकऱ्यांचे मरण असल्याचे वर्षांनुवर्षे दिसून आले आहे.

शेतकऱ्यांच्या या दैन्याकडे काही मंडळी गांभीर्याने, तर अनेक जण त्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठीच काहीबाही करीत असल्याचे अलीकडच्या काही सल्ल्यांवरून लक्षात येते. कोणी म्हणते, एकही पाण्याचा थेंब ज्या फळासाठी लागत नाही अशा सीताफळाची फळशेती शेतकऱ्यांनी करावी, कोणी म्हणते, जीवनसत्त्वयुक्त अशा तरवटाची शेती शेतकऱ्यांनी केली, तर चांगला बाजारभाव मिळेल, आणखी कोणी तरी शेतकऱ्यांना सल्ला देण्याच्या थाटात उठते आणि म्हणते, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चने (सीएसआयआर) विकसित केलेल्या ‘आरआरएल-सीएन-५’ या गवताच्या प्रजातीपासून सुगंधी तेल मिळत असल्याने शेतकऱ्यांनी त्याची शेती करून नफा कमवावा. या संदर्भात ज्येष्ठ शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे म्हणाले, शेतकऱ्यांना असे सल्ले स्वातंत्र्यापासून अविरत दिले जातात. रानवांगे लावा, आवळे लावा त्याचबरोबर डुकरे, शेळी म्हशी पाळून जोडधंदा करा, सेंद्रिय शेती आणि तंत्रज्ञानाची शेती करा, असेही सल्ले देणाऱ्यांची कमी नाही. मात्र, अशाप्रकारे मटक्याचे आकडे सांगणाऱ्यांनी पाहिजे ते वाण लावून किंवा जोडधंदा करून स्वत:चा फायदा करून घ्यावा. शेती तोटय़ात असणे हे कारण आहे तर त्याचा कर्जबाजारीपणा परिणाम आहे. कर्जबाजारीपणावरच आघात करून उपयोग नाही. शेतकऱ्यांची समस्या मुळात समजून घेणे गरजेचे आहे.

अर्धा एकरवाला शेतकरी असो की, १० एकरवाला, त्याच्या परिस्थितीनुसार शेतात काय पिकवायचे, याचे धोरण तो ठरवत असतो. दुष्काळाचे दिवस सोडले तर अशी अनेक वर्ष असतात की, त्याच्या शेतात भरभरून पिकते. कांद्याचा भाव वाढला म्हणजे महागाई आली म्हणून सरकारी हस्तक्षेप करून कांद्याची निर्यात थांबवून तो आयात केला जातो. त्यासाठी मागणी आणि पुरवठय़ाचा सिद्धांत सांगितला जातो. मात्र, जेव्हा पाच रुपये किलोने कांदा किंवा इतर पीक विकले जात नाही तेव्हा जनावरांना खाऊ घातले जाते. तेव्हा मागणी आणि पुरवठय़ाचा सिद्धांत सांगितला जात नाही. तेव्हा शेतकऱ्यांना वाली कोणी राहत नाही, ही मोठी खंत आहे. एका दाण्यापासून हजारो पटींनी भांडवल प्राप्त होत असते. त्याची लूट करणे हे चंगळवादी संस्कृतीला फायद्याचे असते. त्यामुळेच शेतकरी वर्षांनुवर्षे अभावात जगतो, कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो, असे वानखेडे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The purpose of removing those who farmer commit suicide
First published on: 09-10-2015 at 02:52 IST