पदाधिकारी व कलावंतांमधील मतभेदाचा फटका

मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या कलावंतांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या वतीने दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविले जाते. त्यासाठी विविध जिल्ह्य़ांतील परिषदेच्या नाटय़ शाखांकडून कलावंतांची नावे मागविली जातात. उपराजधानीत परिषदेच्या दोन नाटय़ शाखा कार्यरत असताना पदाधिकारी आणि कलावंतांच्या आपसी हेवेदाव्यामुळे यावर्षी एकाही कलावंताचे नाव पाठविण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्यावतीने दरवर्षी जीवनगौरव पुरस्कारासह नाटय़क्षेत्रातील विविध घटकांसाठी कलावंतांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी राज्यातील विविध भागात असलेल्या परिषदेच्या नाटय़शाखांकडून नावे मागविली जात असल्यामुळे त्या जिल्ह्य़ातील नाटय़ शाखा कलावंतांची नावे मध्यवर्ती शाखेला पाठवित असतात. अखिल भारतीय मराठी नाटय़ शाखेची नागपुरात एक मुख्य शाखा कार्यरत आहे. त्यात गेल्या अनेक वषार्ंपासून पदाधिकारी, कलावंत असा वाद सुरू आहे त्यामुळे परिषदेच्या कार्यक्रमांकडे अनेक जण फिरकत नाहीत. दोन वषार्ंपूर्वी नाटय़ परिषदेची उपशाखा स्थापन करण्यात आली. त्या शाखेने मोठा गाजावाजा करीत उद्घाटन केल्यानंतर त्यातील काही सदस्य सक्रिय होते. मात्र, गेल्या काही दिवसात परिषदेच्या दोन्ही शाखा आणि मध्यवर्ती शाखेचे विदर्भाचे प्रतिनिधीत्व करणारे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे यावेळी मध्यवर्ती शाखेकडून नावे मागविण्यात आली असताना ती पाठविण्यात आली नाही. गेल्यावर्षीपर्यंत ज्येष्ठ आणि कनिष्ठ कलावंताचे नाव पुरस्कारासाठी पाठविले जात होते आणि त्यांना पुरस्कार दिले जात होते मात्र यावेळी दोन्ही शाखांमधील कार्यकारिणीती पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला वादामुळे दोन नावे पाठवू शकलो नाही त्यामुळे प्रकाश एदलाबादकर यांना मिळालेला निवेदकांचा पुरस्कार वगळता विदर्भातून एकाही कलावंताचा सन्मान करण्यात आला नाही. मध्यवर्ती शाखेत विदर्भातून पराग लुले, किशोर आयलवार आणि दिलीप देवरणकर यांचा समावेश आहे. या तीन सदस्यांनी पुढाकार घेऊन ही नावे पाठविणे आवश्यक होती मात्र त्यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील कलावंतांवर झाला आहे. अनेक ज्येष्ठ कलावंतांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली असून नाटय़ परिषदेबाबत काही बोलू नका आणि विचारू नका, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

उत्कृ ष्ट निवेदक म्हणून प्रकाश एदलाबादकर यांना नाटय़ परिषदेचा पुरस्कार जाहीर झाला असताना त्यांचे एकटय़ाचे नाव मध्यवर्ती शाखेला पाठविण्यात आले असल्याचे मध्यवर्ती शाखेकडून सांगण्यात आले. एदलाबादकर यांना पुरस्कार मिळाल्याचा विदर्भातील रंगभूमी क्षेत्रात आनंद असला तरी दरवर्षी दोन कलावंतांना पुरस्कार दिले जात असल्यामुळे आणखी एक नाव नागपूरच्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी दिले असते तर दरवर्षीची परंपरा कायम ठेवता आली असती. जाहीर झालेल्या पुरस्कारामध्ये ९९ टक्के पुरस्काराचे मानकरी पुण्या-मुंबईतील असताना विदर्भात मात्र पुरस्कारासाठी पात्र कलावंत नाहीत का, असा प्रश्न रंगभूमी क्षेत्रात उपस्थित झाला आहे.

पुरस्कारासाठी नावे सूचविण्याची जबाबदारी परिषदेची असली तरी नियामक मंडळाच्या कार्यकारिणीवर नागपुरातील तीन प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. यापूर्वी नाटय़ परिषदेकडून पाठविण्यात आलेल्या नावाचा विचार केला गेला नाही. त्यामुळे यावेळी परिषदेने नावे पाठविली नाहीत.

-प्रफुल फरकसे, नाटय़ परिषद अध्यक्ष