प्रशांत देशमुख

वर्धा : वर्धा लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसचा उमेदवार रिंगणात राहणार नाही. काँग्रेसचा उज्ज्वल इतिहास राहिलेल्या वर्धा मतदारसंघात जिल्हा काँग्रेस नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे हे घडत आहे. १९५७ पासून ते २०१९ पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी व्हायचा किंवा दुसऱ्या क्रमांकावर तरी राहायचा. कमलनयन बजाज यांनी विजयाची हॅटट्रिक  केल्यानंतर लागलेल्या आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचे संतोषराव गोडे विजयी झाले होते. त्यानंतर १९८० पासून वसंतराव साठे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली.  प्रथम माकपचे रामचंद्र घंगारे व नंतर १९९६ मध्ये भाजपचे विजय मुडे यांनी साठेंचा पराभव केला. पुढे दत्ता मेघे, प्रभा राव हे निवडून आले. अलिकडच्या काळात सागर मेघे, चारूलता टोकस हे काँग्रेसतर्फे लढले व पराभूत झाले.  परंतु, यावेळी   काँग्रेसचा उमेदवारच नाही. शरद पवार गटातर्फे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे उमेदवार असतील. तसे त्यांनी जाहीरपणे घोषित केले आहे. 

nilesh kumbhani
भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?
Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
congress bastar candidate kawasi lakhma
“यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा

वाटाघाटीत वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सेवाग्राम, पवनारची परंपरा असणारा हा मतदारसंघ काँग्रेस कधीच सोडणार नाही, अशी खात्री दिली जायची. परंतु, आमच्याकडे उमेदवारच नाही म्हणून मित्रपक्षास मतदारसंघ सोडून द्या, असा सांगावा वरिष्ठांना गेला तेव्हा वरिष्ठांनाही त्याचे काहीच सोयरसुतक वाटले नाही. मात्र पुढे काही नेत्यांनी आम्ही लढण्यास तयार आहोत, असे सांगून मुंबई-दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र तेव्हा बराच उशीर झाला होता. हे काँग्रेसच्या जिल्हयातील नेत्यांचेच अपयश असल्याचेच आता बोलले जात आहे.   काँग्रेसच्या उमेदवारीवर अखेरचा खिळा ठोकणारे म्हणून वर्तमान जिल्हा काँग्रेस नेत्यांचीच इतिहासात नोंद होईल. मागच्या निवडणुकीत पवारांनी हा मतदारसंघ मागितला तेव्हा,  तुम्ही बारामती सोडू शकता का, असा प्रतीसवाल काँग्रेस नेत्यांनी करीत त्यांना निरूत्तर केले होते. आज मात्र जिल्हा, प्रदेश व दिल्लीतील नेत्यांनी सपशेल नांगी टाकल्याचे चित्र आहे. मतदारसंघात राष्ट्रवादी नव्हे तर काँग्रेसचीच पुरेशी यंत्रणा टिकून आहे. पंजाची म्हटली जाणारी हमखास मते आहेत.  तुतारीचे नामोनिशाणही नाही. त्यामुळे आता काँग्रेसच्याच नेत्यांना तुतारी वाजवीत गावोगावी फिरावे लागणार आहे. हा जणू काळाने काँग्रेसवर उगवलेला सूडच आहे.