नागपूर, मुंबई, पुणे विमानतळांवर हज यात्रेकरूंची तपासणी
मध्यपूर्व देशातील सुमारे २५ देशांमध्ये संसर्गजन्य ‘मर्स’ या गंभीर आजाराने थैमान घातले असून त्यात मोठय़ा प्रमाणावर मृत्यू होत आहेत. या आजाराने हजहून परतणाऱ्या भाविकांना ग्रासले असून तो भारतात प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने या आजाराचा प्रवेश रोखण्याकरिता नागपूरसह मुंबई व पुणे विमानतळांवर या भाविकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त वरिष्ठ प्रादेशिक संचालक नागपूर विमानतळावर या यंत्रणेची पहाणी करतील.
‘इबोला’ या आजारानंतर जगातील मध्यपूर्व देशातील देशात ‘मर्स’ने नागरिकांना ग्रासले आहे. सौदी अरेबियासह याच भागातील इतर देशातही हा आजार जास्तच फोफावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या निदर्शनात आले आहे. जगात २०१५ साली नोंदवण्यात आलेल्या एकूण ‘मर्स’च्या रुग्णांपैकी ८५ टक्क्यांवर रुग्ण सौदी अरेबिया व शेजारच्या देशात आढळले. आजाराने यंदा अडीज हजारावर मृत्यूही तेथे नोंदविण्यात आले. मर्स रुग्णाच्या कुणी संपर्कात आला तर त्यालाही या जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते.
हज यात्रेकरूद्वारे हा जंतू भारतात प्रवेश करू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेवरून केंद्राने भाविकांची विमानतळांवर आरोग्य तपासणी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार नागपूर, मुंबई, पुणे विमानतळांवर यात्रेकरूवर वैद्यकीय पथकाची नजर आहे. नागपूर विमानतळावर हे वैद्यकीय पथक मध्यरात्री येणाऱ्या विमानाच्या वेळेवर पोहोचते. प्रवासी थर्मल स्कॅनरमधून येताना कुणाला ताप असल्यास स्वयंचलित यंत्रातून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना मिळते. या रुग्णाला वेगळे काढून त्याची वैद्यकीय तपासणी करून माहिती घेतली जाते. काही संशयित वाटल्यास तातडीने मेडिकल, मेयोत रुग्णवाहिकेतून हलवण्याच्या सूचना आहेत. तेथे या रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णाच्या नाकासह घशातील द्रव्याचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्याच्याही सूचना आहेत. अद्याप नागपूरला संशयित रुग्ण आढळलेला नाही.
‘मर्स’ म्हणजे काय?
मर्स हा उंटासह काही प्राण्यांपासून मानवाला होणारा गंभीर जंतूसंसर्गजन्य आजार आहे. अशा रुग्णाला ताप, सर्दी, खोकला, श्वसनास त्रास होणे, अंगदुखीसह विविध त्रास होत असल्याची लक्षणे दिसतात. प्राथमिक स्वरूपात त्वरित निदान करून उपचार केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. मध्यपूर्वेतील सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, जॉर्डन, कुवेत, व्हिएतनाम, चीन, कोरिया, ओमान, कतार, युनायटेड अरब, लेबनॉन, यमेन, अल्जेरिया, टय़ुनिशिआ, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली, मलेशिया, फिलिपाईन्स.
‘ आरोग्य मंत्रालयाचा आढावा’
नागपूर विमानतळावर हज यात्रेकरूंची तपासणी आरोग्य विभाग करीत असून त्याचा आढावा केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाकडून घेतला जात असल्याचे नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ, संजय जयस्वाल यांनी सांगितले.