जिल्ह्यातील तिवसा येथे पिंगळाई नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. हे तिघेही मासे पकडण्यासाठी नदीत टाकलेले जाळे बाहेर काढण्यासाठी नदीच्या पात्रात गेले होते. पण, पुराच्या पाण्यात ते वाहून गेले. जिल्हा बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी पोहचून बुडालेल्या मच्छीमारांचा शोध सुरू केला. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू असल्याचे तिवसाचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी सांगितले.
अनिकेत सुखराम मेश्राम (१८), पंकज विश्वनाथ मेश्राम (२४) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बाळू नांदणे (३२) यांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा >>> नागपूर : विदर्भातील अग्निवीर सैन्य भरतीला सुरुवात
हे तीनही मच्छीमार तिवसा तालुक्यातील मौजा तारखेड येथील रहिवासी होते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैभव फरतारे हे देखील घटनास्थळी पोहचले. तसेच जिल्हा व शोध बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सध्या जिल्हा बचाव पथक घटनास्थळी एकाचा शोध घेत आहे.