नागपूर : बुद्धपोर्णिमेला होणारी मचाण गणना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने कालबाह्य ठरवली.मात्र, लोकांना निसर्गाशी जोडण्यासाठी ‘निसर्गानुभव’ या नावाखाली बुद्धपोर्णिमेला मचाणावर बसून वन्यजीवांच्या निरीक्षणाची संधी वनखात्याने सुरूच ठेवली. गणना करायची नाही, पण वन्यप्राण्यांना जवळून न्याहाळण्यासाठी म्हणून खात्याने कितीही पैसे आकारले तरीही निसर्गप्रेमी ही संधी सोडत नाही.

यावेळी मात्र अकल्पित घडले. माणसे आम्हाला कशी न्याहाळतात, हे पाहण्यासाठी चक्क वाघच मचाणावर चढले. हे अकल्पितच होते आणि वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार सिद्धेश मुणगेकर यांनी हा क्षण अचुक टिपला.

जिल्ह्यातील उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याला ‘जय’ या वाघाने खरी ओळख मिळवून दिली. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातून तो स्थलांतर करुन आला. राष्ट्रीय महामार्ग असो वा धरण, तो बिनधास्त भ्रमंती करत असल्याने लवकरच हे अभयारण्य ‘सेलिब्रिटीं’साठी देखील आकर्षण ठरले. ‘जय’ बेपत्ता (मृत्यूबाबत खात्याकडून अजूनही स्पष्टीकरण नाही) झाल्यानंतर हे अभयारण्य ओस पडले. ‘सेलिब्रिटी’च नव्हे तर सर्वसामान्य पर्यटकांनीदेखील पाठ फिरवली. मात्र, आता पुन्हा एकदा या अभयारण्याला सुगीचे दिवस आलेत.

गोठणगाव प्रवेशद्वारावरील ‘एफ-२’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना लळा लावला आहे. तिच्या पाचही बछड्यांसह ती पर्यटकांना मनसोक्त दर्शन देत आहे. या अभयारण्यात काही वर्षांपूर्वी ‘फेअरी’ या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला. त्यातीलच एक म्हणजे ‘एफ-२’ ही वाघीण. ‘फेअरी’प्रमाणेच ‘एफ-२’ ही वाघीण देखील बछड्यांसह बिनधास्त जंगलात फिरत आहे. पर्यटकांची वाहने आलीत काय, थांबली काय.. तिला आणि तिच्या बछड्यांना काहीही फरक पडत नाही.

मात्र, तिच्याशी जवळीक साधणाऱ्या पर्यटक वाहनांना थेट न्यायालयानेच दणका दिला. आज बुद्धपोर्णिमा आहे आणि राज्यातील सर्वच अभयारण्यात पाणवठ्याशेजारी निसर्गप्रेमींसाठी मचाण उभारण्यात आल्या आहेत. चंद्राच्या लख्ख प्रकाशात निसर्गप्रेमी या मचाणीवरुन पाणवठ्यावरील वन्यप्राणी न्याहाळतील. मात्र, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात बुद्धपोर्णिमेच्या पुर्वसंध्येला वेगळेच दृश्य पहायला मिळाले. अभयारण्याच्या गोठणगाव परिसरात भटकंती करणाऱ्या ‘एफ-२’ वाघिणीच्या बछड्यांनी चक्क मचाणचा ताबा घेतला. आधी एक, नंतर दुसरा असे करत तिन बछड्यांनी या मचाणवर ठाण मांडले. मचाणवर चढल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी फेरफटका मारल्या. त्यातला एक बछडा खाली उतरला आणि तिसऱ्याने मग पुन्हा त्याठिकाणी चढण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांचा ‘निसर्गानुभव’ बाजूलाच राहिला, पण ‘एफ-२’ वाघीण आणि तिच्या बछड्यांनी निसर्गाचा पुरेपूर आनंद घेतला.