दोन दशकांपासूनची प्रक्रिया; २००१ चा नकाशा स्पष्ट
कॅमेरा ट्रॅप आणि गुणसुत्रांच्या तपासणीवरून वाघांनी शेकडो किलोमीटरवरून केलेले स्थलांतर अलीकडच्या काळात उघडकीस येत आहे. मात्र, ही प्रक्रिया आताची नव्हे, तर दीड ते दोन दशकांपासून सुरू आहे. या स्थलांतरादरम्यान येणारे धोके आणि उघडकीस आलेल्या कॉरिडॉरसंदर्भात २००१ मध्ये तयार करण्यात आलेला नकाशा आता स्पष्ट झाला आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या देवलापार वनपरिक्षेत्रात जानेवारी २०१६ मध्ये मृत पावलेल्या वाघाचा गुणसुत्रे तपासणीचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला. कॅमेरा ट्रॅपच्या अहवालानुसार हा वाघ मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले, पण त्याचवेळी या वाघाची गुणसुत्रे ताडोबा-चंद्रपूर लँडस्केपमधील वाघांशी जुळली. वाघाचे मूळ या लँडस्केपमधील निघाल्याने वाघाच्या पूर्वजांनी सुमारे ६०० किलोमीटरचा प्रवास केल्याचे स्पष्ट झाले. मध्य प्रदेशातील वाघांचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील वाघांचे मध्य प्रदेशात होणारे स्थलांतर हे जंगलाच्या संलग्नतेचे सूचक असले तरीही स्थलांतरादरम्यान झालेले राष्ट्रीय महामार्ग, नद्या, रेल्वे याचे धोके मोठे होते. भविष्यात अशा धोक्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी त्या काळात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या जंगल संलग्नतेचा व त्यातून होणाऱ्या स्थलांतराचा तसेच यादरम्यान येणाऱ्या अडथळ्यांचा नकाशा तयार केला होता. त्याचे सादरीकरण त्यावेळी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी अनेक उपक्रमात केले होते आणि सिंचन व संबंधित खात्यालाही तशा सूचना दिल्या होत्या. यापूर्वीही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ तेलंगणात, कोका अभयारण्यात, टिपेश्वर अभयारण्यातील वाघ ताडोबात, बोर अभयारण्यातील वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्पात, तसेच नागझिरा अभयारण्यातील वाघ उमरेड-करांडला आणि मध्य प्रदेशात गेल्याची उदाहरणे ही अलीकडच्या काळातील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधीच्या काही घटना
२००१-२००२ या काळात मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पातून एका वाघिणीने महाराष्ट्रातील चोरबाहुली येथपर्यंत प्रवास केला. एवढेच नाही, तर चोरबाहुली येथे तिने बछडय़ांना जन्म दिला आणि ते बछडे मोठे झाल्यानंतर बछडय़ांस परत तेवढाच प्रवास करत ही वाघीण कान्हा येथे परत गेली होती. तसेच २००७-२००८ मध्येही कर्माझरी येथील नर वाघ चोरबाहुलीत आला, त्यावेळी गळ्यात काहीतरी अडकलेला वाघ या परिसरात फिरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना दिली. वनाधिकारी तेथे पोहोचल्यानंतर वाघाच्या गळ्यात रेडिओ कॉलर लावल्याचे निष्पन्न झाले. बोरचा वाघ काटोल आणि मेळघाटला गेला होता.

More Stories onवाघTiger
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger migration at long distance
First published on: 21-05-2016 at 01:46 IST