नागपूर : राज्यात विदर्भात वाघांची संख्या अधिक असल्याने साहजिकच येथून होणाऱ्या वाघाच्या स्थलांतरणाचे प्रमाणही अधिक आहे. येथील वाघ मध्य प्रदेश, तेलंगण आदी राज्यांत पोहोचलेत. आता पश्चिम महाराष्ट्रातूनही कर्नाटक, गोवा या राज्यात वाघाचे स्थलांतरण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर या तीन राज्यांतील व्याघ्र अधिवास संरक्षणासह कॉरिडॉर संलग्नतेच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

महाराष्ट्रातील सह्याद्री ते कर्नाटकातील काली असा ३०० किलोमीटरचा प्रवास वाघाने करोनाकाळात केला. सह्याद्रीतील नंदुरबार येथे २०१८ मध्ये पहिल्यांदा हा वाघ कॅमेराकक्षेत आला. त्यानंतर मे २०२० मध्ये कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात तो दिसला. त्यामुळे मध्य पश्चिम घाटातील वाघांचे कॉरिडॉर अजूनही व्यवहार्य आहेत. यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर तिलारी खोऱ्यात २०१८ मध्ये कॅमेऱ्यात कैद झालेली वाघीण जून २०२१ मध्ये गोव्यातील म्हादई अभयारण्यात दिसून आली. तर कर्नाटकातील भीमगड अभयारण्यातील वाघदेखील म्हादई अभयारण्यात दिसला. गोव्यातील म्हादई अभयारण्यात कर्नाटकातील वाघ आणि महाराष्ट्रातील वाघिणीचे वास्तव्य आहे. मात्र, जानेवारी २०२० मध्ये या अभयारण्यात विषबाधेने चार वाघांचा मृत्यू झाल्यानंतर या स्थलांतरित वाघ आणि वाघिणीच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह आहे. वाघांचे हे स्थलांतरण कॉरिडॉरची संलग्नता दाखवत असले तरी जनुकीय वैविध्य जपण्यासाठी हा कॉरिडॉर आणि अधिवासाची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषकरून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांसाठी अधिक मजबूत अधिवास तयार करण्यासाठी महाराष्ट्र वनखात्याने पावले उचलली आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम म्हणजे तिलारी संवर्धन राखीवसह चंदगड संवर्धन राखीव तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथेही वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. गोव्यात झालेल्या वाघांच्या स्थलांतरणानंतर येथील व्याघ्र अधिवासाच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. वाघांचे जनुकीय वैविध्य कायम राखण्यासाठी कॉरिडॉर संरक्षणाकरिता तिन्ही राज्यांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे.

अडथळा कोणता?

खाणी हा कॉरिडॉरमधील मुख्य अडथळा आहे. कोल्हापूर विभागातील चांदोली ते राधानगरी या मुख्य कॉरिडॉरमध्ये खाण प्रकल्प येत आहे. शाहू वाडीतही हा प्रकल्प येण्याच्या मार्गावर आहे. विशालगड व चांदोलीच्या मध्ये गिरगावमध्ये खाण सुरू आहे. जोपर्यंत कॉरिडॉरमधील या खाणींना परवानगी नाकारली जात नाही, तोपर्यंत वाघ सुरक्षित राहू शकत नाही. कर्नाटक, गोव्यात येथील वाघ जात असतील तर तिकडचेही वाघ इकडे येऊ शकतात. अशा वेळी वाघांचा मार्ग आणि अधिवास सुरक्षित असणे आवश्यक आहे.

 – रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक सातारा व सदस्य, वन्यजीव अपराध नियंत्रण शाखा