अपघातमुक्तीसाठी पोलिसांचा कठोर निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. अनेकदा वाहनचालक काही अंतर वाचवण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवतात व यात अपघात होतो. विरुद्ध दिशेने वाहन चालवताना अपघात होऊन कुणाचा मृत्यू झाल्यास निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्य़ाऐवजी पोलिसांकडून आता थेट ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

रविवारी रात्री रामटेकवरून उपराजधानीत परतणाऱ्या एका दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका जेसीबीने जोरदार धडक दिली. यात पृथ्वीराज मनोहरराव जाधव (२१) रा. हाऊसिंग बोर्ड, रघुजीनगर आणि सुशांत नागदेवते रा. आदिवासी कॉलनी या दोन तरुणांचा मृत्यू झाला तर शुभम गुणवंतराव वाघ (२२) रा. आदिवासी कॉलनी हा जखमी आहे. याप्रकरणी पोलिसांनी जेसीबीच्या चालकाविरुद्ध प्रथम निष्काळजीपणाने वाहन चालवण्यामुळे गुन्हा दाखल केला होता. पण, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जेसीबी चालकाने जाणीवपूर्णक विरुद्ध दिशेने वाहन चालवले असून इतर वाहनचालकांचे प्राण धोक्यात घातले. यामुळे त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

शहरातील बहुतांश रस्त्यांवर दुभाजक आहेत. रस्ता दुभाजक असल्याने अनेकदा वाहनचालकांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याकरिता यू-टर्न घेऊन परत यावे लागते. पण, हा यू-टर्न न घेता व अंतर वाचवण्यासाठी काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवतात. त्यामुळे समोरून गतीने येणारी वाहने विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर धडकतात व अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागते. विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांमुळे दुसऱ्या वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने पोलीस आयुक्तांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली असून आता यापुढे विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांमुळे कुणाचा मृत्यू झाल्यास वाहनचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत ८६ जणांचा मृत्यू

याबाबत प्राप्त आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी जानेवारी ते ७ मे पर्यंत ३३९ गंभीर अपघातांची नोंद झाली. यंदा आतापर्यंत ३२७ अपघात घडले आहेत. २०१७ मध्ये ३४१ अपघात घडले होते. या अपघातांमध्ये २०१७ ते २०१९ या वर्षांमध्ये अनुक्रमे ८६, ८७ आणि ८६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic collision traffic rules
First published on: 05-06-2019 at 01:35 IST