संघ मुख्यालय परिसरात लावलेले रोपटे निस्तेज
सरकारतर्फे राज्यभरात राबवण्यात आलेल्या दोन कोटी वृक्षलागवड मोहिमेची नोंद ‘लिम्का बुक’मध्ये झाली असतानाच सत्ताधाऱ्यांचे स्फूर्तिस्थान असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसरातच या वृक्षलागवडीची हेळसांड झाल्याचे निदर्शनास आले आहे. दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत आणि सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी लावलेल्या रोपांचे निगेअभावी अस्तित्वच संपुष्टात आले आहे.
राज्यभरात दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला होता. त्यानिमित्ताने १ जुलै रोजी वनविभाग आणि विविध पर्यावरणवादी, शैक्षणिक व सामाजिक संघटनांतर्फे वृक्षारोपणाचे कार्यक्रमही राबविण्यात आले. याच कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहरातील मोहिते शाखेतर्फे संघ मुख्यालय परिसरातील आदितवार शाळेजवळ एका मोकळ्या मैदानात सरसंघचालक मोहन भागवत आणि सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते. सरकारी उपक्रमात खुद्द सरसंघचालकांनी सहभाग घेतल्याने ही महत्त्वाची घटना ठरली होती. त्यातच राज्य सरकारच्या या उपक्रमाची नोंद थेट ‘लिम्का बुक’ने घेतल्याने सरकारसाठी ही सन्मानाची बाब ठरली. या पाश्र्वभूमीवर संघ मुख्यालय परिसरात लावण्यात आलेल्या झाडांचे काय झाले, याची तपासणी केली असता ती सर्व निगेअभावी वाळली असल्याचे निदर्शनास आले. उपक्रमांतर्गत या परिसरात डझनभर झाडे लावण्यात आली होती. त्यांच्या संरक्षणासाठी ‘ट्री गार्ड’ही लावण्यात आले होते. मात्र निगेअभावी ही सर्व झाडे नाहीशी झाल्याचे सध्याचे येथील चित्र आहे. ‘ट्री गार्ड’ही नाहीसे झाले आहेत. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल शहर भाजपकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ मुख्यालय परिसरात असलेल्या शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. या झाडांच्या रक्षणासाठी ट्री गार्डही बसवण्यात आले होते. मात्र, झाडे व ट्री गार्ड यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने दोन्ही आता नाहीसे झाले आहेत.