अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : कारागृहात नोकरी करताना येणाऱ्या अडचणी, समस्या, तक्रारी मांडण्यासाठी राज्यभरातून शेकडो कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी हे अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात ‘आज्ञांकित कक्ष’साठी (ओआर) अर्ज करतात. मात्र, काही वरिष्ठांच्या अनिच्छेमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे अर्ज अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचूच दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राज्यातील ६० कारागृहांसह संबंधित कार्यालयात १० हजारांपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या अनेक अडचणी असतात. अनेकदा वरिष्ठ अधिकारी नाइलाजास्तव किंवा विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे कर्मचारी कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करतात. परंतु, त्या तक्रारींनाही वरिष्ठ केराची टोपली दाखवतात. त्यामुळे  कर्मचारी त्रस्त होऊन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह), पुणे कार्यालयात अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडण्यासाठी लेखी अर्ज करतात. परंतु, नियमांनुसार तो लेखी अर्ज कारागृह अधीक्षक, कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयामार्फत पाठविला जातो. अनेकदा दोन्ही कार्यालयांतून आज्ञांकित कक्षासाठी आलेले अर्ज अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) कार्यालयात पाठवलेच जात नाहीत. त्यामुळे कनिष्ठ अधिकारी आणि कारागृह रक्षकांना आज्ञांकित कक्षात उपस्थित राहण्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत पुण्यातील अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाने सांगितले की, आमच्या कार्यालयात आज्ञांकित कक्षासाठी अर्ज येत असतात. परंतु, ही माहिती गोपनीय असल्यामुळे ती सांगता येणार नाही.

दर शुक्रवारी..

पुण्यातील अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात राज्यातील सर्वच कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर शुक्रवारी आज्ञांकित कक्ष असतो. तेथे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेता येते. मात्र,  अनेक वरिष्ठ अधिकारी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी मुद्दामून सुटी देत नाहीत. तसेच पुण्यातील कार्यालयात क्लृप्ती वापरून कर्मचाऱ्यांचे अर्ज वरिष्ठांपर्यंत पोहोचणार नाहीत, अशीही व्यवस्था करतात, अशी माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trick depriving commanded cell anger among state prison staff over inability raise issues ysh
First published on: 29-05-2022 at 00:02 IST