शिकवणीच्या शिक्षकानेच एका बारावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. अनंत मोहनराव निमजे (४१, रा. प्लॉट क्रमांक-१०८, वर्धमाननगर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत शनिवारी उघडकीस आली.
पीडित मुलगी अकरावी उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे बारावीसाठी तिने वर्धमाननगर येथील एन.एस.वाय. एज्युकेशन सेंटर येथे बाराव्या वर्गाची शिकवणी लावली. ४ जूनला संध्याकाळी ७ वाजता जीवशास्त्र विषयाचा वर्ग संपल्यानंतर त्याने पीडित मुलीला थांबवून तिला एकटय़ात मानवी प्रजनन प्रक्रिया समजाविण्याच्या बहाण्याने मोबाईलमधून अश्लील छायाचित्र दाखविले. मुलीला किळस आल्याने ती त्या दिवशी निघून गेली. परंतु दुसऱ्या दिवशीही त्याने मुलीला थांबविले आणि शारीरिक संबंधांची एक चलचित्र असून ते बघण्याचा आग्रह धरला. त्यावेळी मुलगी पळून गेली. घरी परतल्यानंतर तिने आपल्या आईला सर्व हकिकत सांगितली. मुलीच्या आईने मुलीला घेऊन लकडगंज पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध भादंविचे ३५४, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ११, १२ आणि ६७ (अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
पत्नी, बहीण आदर्श शिक्षिका
आरोपी हा स्वत:च्याच घरात शिकवणी घेतो. त्याची पत्नी आणि बहीणही शिक्षिका आहे. त्याची पत्नी व बहिणीला राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. परंतु आरोपीच्या अशा स्त्रीलंपटपणामुळे त्यांच्या कुटुंबाला आणि शिक्षणासारख्या पवित्र व्यवसायाला गालबोट लागले.