अमरावती : नवीन तूर बाजारात यायच्या आधीच पश्चिम विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीचे भाव कमी झाले असून दर गेल्या महिनाभरात दीड हजार रुपयांनी घसरले आहेत. आयात सुरु झाल्यानंतर तुरीचे दर आणखी कमी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.यंदा देशातील तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आयातवाढीवर मर्यादा आहेत. त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा चांगली वाढ होऊ शकते. पण, त्यासाठी मार्च पर्यंत वाट पहावी लागेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे भाव नोव्हेंबर महिन्यात सरासरी १० ते ११ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते. पण मागील तीन आठवड्यांमध्ये तुरीच्या भावात सतत घट होत गेली. सध्या तुरीला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी तुरीला सरासरी ८ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. शनिवारी सरासरी ८ हजार ५०० रुपये भाव मिळाला. अकोला बाजार समितीतही दर गेल्या आठवडाभरापासून ८ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहेत.गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. ही आवक आणखी एक महिन्यानंतर जास्त होऊ शकते. सध्या नवीन तूर बाजारात येण्याच्या आधी साठवून ठेवलेली तूर बाजारात येत आहे.
हेही वाचा >>>देशातील कापूस उत्पादनात यंदा आठ टक्के घट; ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’चा दुसरा अहवाल जाहीर
बाजारात आवक वाढल्यानंतर भाव कमी होतात. त्यातच आफ्रिका आणि म्यानमारमधून तूर आयात केली जाणार आहे. नवीन तूर बाजारात येण्याच्या काळात आयातही सुरु होईल. त्यामुळे सध्या भाव कमी झाले आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.तुरीची आवक मुख्यतः जानेवारीपासून सुरु होते यंदाही याच काळात बाजारातील आवक जास्त राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मार्चपर्यंत तुरीच्या बाजारावर दबाव राहू शकतो. म्हणजेच भावपातळी ७ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारातील तुरीची आवक मार्च महिन्यापर्यंत जास्त राहू शकते, असा अंदाज आहे. मार्च महिन्यानंतर बाजारातील आवक कमी होत जाईल. त्यामुळे दराला आधार मिळू शकतो. मार्चनंतर बाजारात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. सर्व भीस्त नव्या मालावरच राहील. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर तुरीच्या भावात तेजी येऊ शकते. यंदा तुरीला १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी ठेवून आहेत.