अकोला : वाशीम जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या पावसाने ७८ हजारांवर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले. पारंपरिकसह भाजीपाला, हळदीचे ८० हजार हेक्टरवरील पिके पावसामुळे मातीत गेली आहेत. जिल्ह्यातील २५० घरांची पडझड झाली, असे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमुद करण्यात आले.

वाशीम जिल्ह्याला धो-धो पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सरासरी ५३.४ मि. मी. पाऊस पडला असून १३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील नऊ कुटुंबातील ४४ जणांचे स्थलांतरण करण्यात आले. २३ लहान व नऊ मोठ्या अशा एकूण ३२ जनावरांचा मृत्यू झाला.

वाशीम ६७, रिसोड ७५, मालेगाव ५७, मंगरूळपीर ५१ अशा एकूण २५० घरांची पडझड झाली. पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशीम तालुक्याच्या ३५ गावातील सात हजार ७६६ शेतकऱ्यांच्या आठ हजार ३४७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील १२७ गावातील ४६ हजार ३७८ शेतकऱ्यांचे ५० हजार ३११ हेक्टर, रिसोड तालुक्याच्या १८ गावातील आठ हजार ७२३ शेतकऱ्यांचे १० हजार ८१७ हेक्टर, मानोराच्या सहा गावातील १७७ शेतकऱ्यांचे १८५ हेक्टर, कारंजाच्या एका गावातील १५ शेतकऱ्यांचे ५.९९ हेक्टर आणि मंगरुळपीर तालुक्याच्या १५ गावातील १० हजार ४८९ हेक्टर अशा एकूण जिल्ह्यातील २६१ गावातील ७८ हजार ८०४ शेतकऱ्यांचे ८० हजार १५५ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, हळद, भाजीपाल्यासह इतर पिकांना पावसाचा जबर फटका बसला आहे. वाशीम आणि मालेगाव तालुक्याच्या ११ गावातील २२८ हेक्टर जमीन खरडून गेली असून ४२५ शेतकरी बाधित आहेत.

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल

वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्याला १६ ऑगस्टलाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. तालुक्याच्या ६७ गावातील २९ हजार ८४० शेतकऱ्यांचे ३७ हजार ८२७ हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. याच दिवशी जिल्ह्यात नऊ घरांची पडझड झाली. वाशीम जिल्ह्यात या अगोदर ७ ते १० ऑगस्टदरम्यान देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासनाने तत्काळ पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यात आंदोलन देखील झाले.