अकोला : शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. तरीही शहराचा पाणी पुरवठा विस्कळीतच आहे. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून चुकीच्या नियोजनामुळे टाकलेली जलवाहिनी गत चार वर्षांपासून विनावापर पडून आहे. या जलवाहिनीचा वापर करण्याची मागणी नीलेश देव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. गत चार वर्षांपूर्वी स्थानिक जठारपेठ भागात जठारपेठ चौक ते प्रसाद कॉलनीपर्यंत व तेथून रेल्वे कर्मचारी निवासस्थानापर्यंत टाकलेल्या ३५० व्यासाच्या जलवाहिनीचे नियोजन चुकीचे असल्याचे लक्षात आले. हा प्रकार निदर्शनात आणून दिल्यावरही प्रशासनाकडून जलवाहिनी टाकण्यात आली. आता ती जलवाहिनी जमिनीखाली माती खात पडून आहे. या विनावापर पडलेल्या दोन कोटी रुपयांच्या जलवाहिनीला वापरात आणावे व त्या माध्यमातून प्रसाद कॉलनी, केला प्लॉट, ज्योती नगर या भागातील पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या भागात कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दूर होवून योग्य दाबाने पाणी पुरवठा होईल. व्यर्थ गेलेला पैसा वापरात येईल. एक वेळ ही जलवाहिनी स्वच्छ करून तीन ते चार ठिकाणी जोडणी केल्यास या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होऊन व्यर्थ गेलेला खर्च पुन्हा कामी येवू शकतो, असा दावा नीलेश देव यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे..