दारूच्या नशेत दोन मित्रांनी वेणा नदीत पोहण्याची पैज लावली. मात्र, नदीला मोठा प्रवाह असल्यामुळे एक मित्र पुरात वाहून गेला, तर दुसरा थोडक्यात बचावला.ही घटना हिंगणा तालुक्यातील कोतवाडा परिसरात मंगळवारी घडली. पुरात वाहून गेलेल्या मित्राचा बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गुमगाव-कोतेवाडापासून ७ कि.मी. अंतरावरील पेठ देवळी शिवारात मृतदेह आढळून आला. रवींद्र मनोहर बारापात्रे (३४) रा. कोतेवाडा असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा >>> विदर्भ विकास मंडळ पुनर्जीवित करण्याकडे दुर्लक्ष ? ; विरोधात असताना आक्रमक भाजप सत्तेत आल्यावर गप्प

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र आणि त्याचा मित्र सूरज नारायण चाफेकर (४०) यांनी दारू ढोसली. दारूच्या नशेत दोघांनी वेणा नदीत पोहोण्याची पैज लावली. दोघांनी कोतेवाडा-गुमगाव दरम्यान असलेल्या पुलावरून वेणानदीच्या पात्रात उडी घेतली. मात्र सततच्या पावसामुळे नदीला पूर होता. दारूच्या नशेत असल्याने हे त्यांच्या लक्षात आले नाही. पुरात दोघेही वाहू लागले. नदीतून बाहेर निघण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

या प्रयत्नात नदीपात्रातून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला पोहत बाहेर निघण्यात सूरजला यश आले. मात्र, रवींद्र पुरात वाहून गेला. माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळावर पोहोचले. काही तरुणांच्या मदतीने वेणा नदीच्या काठावर दूरपर्यंत रवींद्रचा शोध घेण्यात आला. मात्र त्याचा शोध लागला नाही. मुसळधार पावसामुळे नदीचा पूर वाढला आणि शोधकार्य थांबवावे लागले.

हेही वाचा >>> चित्त्यांच्या भारतप्रवासासाठी विमानात बदल ; सुरक्षेसाठी खास व्यवस्था; पशुवैद्यकांचीही सज्जता

बुधवारी सकाळी हिंगणा पोलीस व ग्रामस्थांनी पुन्हा रवींद्रचा शोध सुरू केला. नदीला पूर असल्याने रवींद्र वाहत दूर जाऊ शकतो असा अंदाज होता. त्यामुळे हिंगण्याचे ठाणेदार विशाल काळे यांनी बुटीबोरीचे ठाणेदार भीमानंद पाटील यांना याबाबत माहिती दिली. याच दरम्यान देवळी शिवारात काही गावकऱ्यांना रवींद्रचा मृतदेह आढळून आला.