नागपूर : एका आयटी कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह दोन कनिष्ठ कर्मचारी दारू पीत बसले होते. दारु पिल्यानंतर ‘बॉसगिरी’ करून नोकरीवरून काढण्याची धमकी दिल्याने चिडलेल्या दोघांनी बॉसच्या छातीत चाकू भोसकून खून केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे हत्याकांड तीन दिवसांनंतर उघडकीस आले. बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. एल. देवनाथन एन.आर. लक्ष्मीनरसिम्हन (२१, रा. फरीदाबाद, हरियाणा) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. तर पवन अनिल गुप्ता (२८, अनुपपूर, मध्यप्रदेश) आणि गौरव भिमसेन चंदेल (३२, बैतूल, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – अकोला : बारावीच्या परीक्षेत बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी बनला तोतया पोलीस, असे फुटले बिंग…

मिहानमधील हेजावेअर कंपनीत एल. देवनाथन हे वरिष्ठ व्यवस्थापक पदावर नोकरीवर होते. त्याच कंपनीत पवन गुप्ता आणि गौरव चंदेल हे कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत होते. तिघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे रात्री बेरात्री कंपनीतील पाळी संपल्यानंतर तिघेही नेहमी पहाटेपर्यंत दारू पित बसायचे. मात्र, देवनाथनच्या हाताखाली दोघेही आरोपी कनिष्ठ पदावर काम करीत असताना अनेक चुका होत होत्या. त्यांना कार्यालयात वारंवार देवनाथन पानउतारा आणि अन्य कर्मचाऱ्यांसमोर अपमानित करीत होता. ते दोघेही देवनाथनच्या ‘बॉसगिरी’ला कंटाळले होते. देवनाथला गलेलठ्ठ पगार असल्यामुळे तो नेहमी दारुवर पैसे उडवित होता. देवनाथनने सोमवारी मध्यरात्री आरोपी गौरव आणि पवन या दोघांना दारू पिण्यासाठी बेलतरोडीतील अग्नीरथ संकूल, श्यामनगर येथील भाड्याने घेतलेल्या सदनिकेत बोलावले. तिघांनीही पहाटेपर्यंत बसून दारू ढोसली. ‘कामात होणाऱ्या चुका मी सहन करणार नाही. तुमची नोकरी करण्याची ऐपत नाही. यानंतर चुका झाल्यानंतर नोकरीवरून काढून टाकेल’ अशी धमकी देवनाथनने दोघांनाही दिली. कार्यालयातील अपमान आणि नोकरीवरून काढण्याच्या धमकीमुळे चिडलेल्या पवन आणि गौरवने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. दोघांनीही देवनाथनला जास्त दारु पाजली आणि त्यानंतर छातीत चाकू भोसकून खून केला. हे हत्याकांड उघडकीस येताच बेलतरोडी पोलिसांनी पवन आणि गौरवला अटक केली. त्यांनी खून केल्याची कबुली दिली.

अपघात झाल्याचा केला बनाव

आरोपी पवन आणि गौरव यांनी देवनाथचा खून केल्यानंतर ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल केले. दारुच्या नशेत बाथरुममध्ये गेल्यानंतर पाय घसरुन चाकूवर पडल्याने जखमी झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, पवन आणि गौरवच्या वागण्यावर पोलिसांना संशय होता. तपासात दोघांचेही जबाब पोलिसांनी घेतले. दोघेही घटनेबाबत वेगवेगळी माहिती देत होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांना खाक्या दाखवताच नोकरीवरून काढण्याची धमकी दिल्यामुळे खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.

हेही वाचा – नागपूर : लहान मुले मोबाईल चोरी करायचे अन म्होरक्याला नेऊन द्यायचे…

१७ दिवसांत १४ वे हत्याकांड

पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल रुजू झाल्यानंतर शहरात हत्याकांडाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीत. गुन्हेगारांमधील टोळीयुद्धासह किरकोळ कारणावरून हत्यासत्र सुरू आहे. उपराजधानीत गेल्या १७ दिवसांत १४ खून झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यातही वाठोडा आणि नंदनवनमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वसुलीत मग्न असणाऱ्या काही ठाणेदारांना आणि गुन्हे शाखेच्या युनिटच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गांभीर्य दाखविण्याची गरच निर्माण झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two person murder senior incident in nagpur adk 83 ssb