अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशत
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रविवारी एकाचवळी दोन साप निघाल्याची धक्कादायक माहिती आहे. या घटनेमुळे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. राज्य कामगार विमा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी अजगरांची दोन पिल्ले मिळाल्याचा सर्पमित्रांचा दावा असतानाच या घटनेमुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये धडकीच भरली आहे.
मनोरुग्णालयात निघालेले साप हे पाच ते सहा फुटांचे असल्याची माहिती आहे. अर्धा तासापेक्षा अधिक वेळ ते मनोरुग्णालयाच्या आवारात होते. साप निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दोन्ही सापांची प्रणयक्रीडा सुरू असल्यामुळे नर आणि मादी असल्याचा अंदाज येथील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. येथील मनोरुग्ण दोन्ही सापांकडे उत्सुकतेने बघत होते. त्यांना या सापांबद्दल मनात भीती नव्हती. कधी कोणता मनोरुग्ण सापाजवळ जाईल हे सांगता येत नव्हते. विशेष असे की, अनेक वार्डामध्ये रुग्णांची गर्दी असल्याने काही रुग्ण खाली झोपतात. या रुग्णांना साप चावल्यास त्यांच्या जीवाला धोका होण्याची भीती आहे. मनोरुग्णालय परिसरात असलेल्या वृक्षाखाली दोन्ही साप अर्धा- पाऊनतास असल्याने सांगण्यात आले. सुरुवातीला एका कर्मचाऱ्याला साप दिसले. तो ओरडल्यानंतर मात्र सर्व कर्मचारी गोळा झाले. काही कर्मचाऱ्यांनी सापांचे छायाचित्रण केले. मोबाईलद्वारे सोशल मिडियावर प्रसारित केले. मात्र येथील मनोरुग्णांच्या जीवाला भीती असतानाही साप येऊ नये यासाठी प्रशासनाकडून काही केल्या जात नसल्याचीही ओरड याप्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. मनोरुग्णालयाच्या आवारात झुडपी जंगल आहे. मोठे वृक्ष आहे. यामुळे येथे सरपटणारे प्राणी दिसतात. मात्र मनोरुग्णालयाच्या वॉर्डात साप शिरू नये यासाठी प्रशासनाने काळजी घेण्यासाठी कोणत्याही उपाययोजना मात्र केल्या नसल्याने ते करण्याची गरज या घटनेमुळे पुढे आली.