अकोला : शेतकऱ्यांच्या साथीने वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अनोखी परंपरा अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यात उमरा गावात गत ३५० वर्षांपासून जोपासली जात आहे. तान्हा पोळ्याच्या दिवशी वृषभराजाची आकर्षिक सजावट करून चक्क रथात बसवत गावातून मिरवणूक काढली जाते. या आगळ्यावेगळ्या परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिकांची उमरा गावात मोठी गर्दी होते. उमरा गावचा हा ‘द्वारका’ लोकोत्सव झाला आहे.
अकोला जिल्ह्यात सण, उत्सवांची प्राचीन परंपरा निरंतर सुरू आहे. चातुर्मासात पालखी, कावड महोत्सव, धारगड यात्रा, पोळा उत्सव, द्वारका उत्सव, गणपती विसर्जन मिरवणूक आदी उत्साहात साजरे केले जातात. पोळा सणाची जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आहे. बैलपोळ्याचा दिवस हा बैलांना आराम देण्याचा दिवस असतो, ते वर्षभर राबतात. उमरा गावातील द्वारका उत्सवाचे राज्यासह संपूर्ण देशात नावलौकिक आहे. बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आणि सोबती आहे, जो वर्षभर बरोबरीने कष्ट करत असतो. बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासह त्यांचे उपकार फेडण्यासाठी चक्क रथातून वृषभराजाची मिरवणूक काढणारे उमरा हे देशातील एकमेव गाव असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तब्बल ३५० वर्षांपासून अपवाद वगळता ही परंपरा जोपासली जात आहे.
उमरा गावात साजरा होणारा एक पारंपरिक उत्सव आहे. ज्यामध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बैलांना रथात बसवून त्यांची मिरवणूक काढली जाते. हा उत्सव दरवर्षी साजरा केला जात असून, वर्षभर शेतात केलेल्या मेहनतीबद्दल बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडून द्वारका उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात बैलांना रथात बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. रथ स्वतः शेतकरीच ओढतात, ज्यामुळे हा उत्सव बैलांप्रती खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त होते.
संस्कृती आणि परंपरांचे महत्वाचा भाग
उमरा गावात साजरा होणारा हा द्वारका उत्सव, महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती आणि परंपरांचा एक महत्वाचा भाग आहे. उमरा गावातील द्वारका उत्सव पूर्वी मर्यादित स्वरूपात साजरा केला जात होता. आता गावातील तरुणाईने आपलीही परंपरा अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी द्वारका उत्सवाला व्यापक स्वरूप दिले. अनेक रथांमधून बैलांची मिरवणूक काढली जाते. हा उत्सव बघण्यासाठी इतर राज्य-जिल्ह्यातून नागरिक गावात दाखल होतात. यंदा देखील द्वारका उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून सायंकाळी उमरा गावातून मिरवणूक काढली जाणार आहे.