कायद्यासाठी आयोगाचा पुढाकार -विजया रहाटकर
‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या प्रकरणामध्ये गेल्या काही वर्षांत वाढ होत असताना त्यात अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश जास्त असून ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब आणि यावर अभ्यास करून काही कायदा करता येईल का, त्यादृष्टीने आयोग पुढाकार घेणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.
महिला आयोग आपल्या द्वारी या कार्यक्रमातंर्गत रविभवनमध्ये महिला संदर्भातील जनसुनावणी घेण्यात आली. नागपुरात ५८ प्रकरणे हाताळण्यात आली असून त्यात सर्वात जास्त प्रकरणे ही कौटुंबिक हिंसाचाराची होती. शिवाय ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ची अनेक प्रकरणे या सुनावणीच्यावेळी आली असून त्यात अल्पवयीन युवक-युवतींची प्रकरणे असून ती चिंतेची बाब आहे. विशषत: ग्रामीण भागातून अशी प्रकरणे समोर आली आहेत. ५८ पैकी काही प्रकरणे अतिशय गंभीर आहेत आणि त्यावर अभ्यास करून किंवा समुपदेशन करून ती सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आजच्या सुनावणीला विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील ५८ प्रकरणे समोर आली असून त्यात नागपुरातील ५१, भंडारातील ४, गोंदिया, अकोला आणि गडचिरोलीतील एका प्रकरणाचा समावेश आहे. वर्धा, चंद्रपूर आणि अमरावतीवरून एकही प्रकरण आयोगासमोर आले नाही. मालमत्तेवरून वादाची प्रकरणे या सुनावणीमध्ये समोर आली.
‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या संदर्भात कडक कायदा करून प्रश्न सुटणार नाही तर जनजागृती करण्याची गरज आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर यापुढे महिला आयोग जाणार असून त्या त्या भागातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले.
अतिप्रसंगाला विरोध करताना रामटेक तालुक्यातील कांद्री येथील १४ वर्षीय मुलीच्या हाताची दोन बोटे कापली गेली असताना त्यातील आरोपींना अटक झाली आहे. त्या मुलीची भेट घेऊन सर्व माहिती घेण्यात आली आहे. आरोपी कुख्यात गुन्हेगार असल्यामुळे त्याला या प्रकरणात जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. आयोगाच्यावतीने या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही विजया रहाटकर यांनी सांगितले.