चुकीच्या रेल्वेगाडीत बसल्यावर उतरण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन पत्नीचा दुर्दैवी मृत्यू पतीच्या डोळ्यादेखत झाल्याची घटना अकोला रेल्वेस्थानकावर गुरुवारी दुपारी घडली. याचा जबर धक्का पतीला बसला आहे. एका चुकीमुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.

अकोला रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक पाचवर भीमराव इंगळे (६०) आणि त्यांच्या पत्नी नंदाबाई भीमराव इंगळे (५५, रा.चोहगाव, जि. वाशीम) हे दोघे वाशीमला जाण्यासाठी रेल्वेची वाट पाहत होते. याच फलाटावर अकोटकडे जाण्यासाठी एक रेल्वेगाडी लागली. दोघेही या गाडीत चढले. ती गाडी अकोटकडे जाणारी होती. थोड्या वेळानंतर आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. रेल्वेगाडी सुटली होती. पती-पत्नीने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नंदाबाई यांचा तोल गेल्याने त्या दरवाज्यातून खाली कोसळल्या. त्या रेल्वे आणि फलाटाच्या मधात पडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पतीने देखील रेल्वेतून उडी मारली. त्यात ते जखमी झाले.

हेही वाचा >>>नागपूर: भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही; फडणवीस

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. किरकोळ जखमी झालेल्या पतीवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. काही वेळानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या घटनेमुळे अकोला रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली होती.