अमरावती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकवेळा स्वपक्षीय नेत्यांवरही टीका केली आहे. सोमवारी मेळघाटमधील कोठा येथे बोलताना त्यांनी नेत्यांच्या वर्तनाबद्दल टोला लगावला.

नितीन गडकरी म्हणाले, समाजातील वंचितांसाठी काम करणे अवघड आहे. त्यांची सेवा करणे हे व्रत आहे. जे लोक भौतिक सुखांचा त्याग करून सामाजिक जाणिवेतून दु:खी, पीडितांची सेवा करतात, तेच संत म्हणून ओळखावे. मेळघाटात आदिवासींची अविरत सेवा करणारे डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, निरूपमा देशपांडे, डॉ. सातव हेच खरे संत आहेत. नाहीतर नेतेमंडळी केवळ मते मागण्यासाठी येतात. भरपूर आश्वासने देतात आणि निघून जातात. मीही मते मागतो. पण, या भागातील नागरिकांनी रस्त्याच्या दुर्दशेविषयी आपल्याला माहिती दिली आहे. मी या विषयात लक्ष घालणार आहे. बऱ्हाणपूर ते अमरावती हा मार्ग चौपदरी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे.

नितीन गडकरी म्हणाले, मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कोठा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत. येत्या काळात या ठिकाणी पाच कोटी रुपयांच्या कोसा साडी निर्मितीचा उद्योग उभारण्यात येणार आहे.

गडकरी म्हणाले, मेळघाटातील रस्त्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाण आहे. रस्त्यांच्या विकासाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. देशातील महामार्गाचे काम एशियन बँक करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे काम कशा पद्धतीने करण्यात येईल, याची माहिती घेण्यात येईल. आदिवासींमध्ये कौशल्य असून त्यास प्रशिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबूच्या सुबक वस्तू तयार करण्यात येत असून जगभरातील ६० देशांमध्ये या वस्तू पोहोचल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आपल्यापर्यंत चालून आला पाहिजे, अशा वस्तू निर्मिती करण्यावर भर द्यावा. आज विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. याचा उपयोगही करून घेणे आवश्यक आहे. कोशाच्या साडीला जगभरात मागणी असून यासाठी पाच कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येईल. प्रकल्पासाठी आवश्यक असणारा दोन कोटी रुपयांचा स्वनिधी संस्थेसाठी देणगी देण्यात येणार आहे.

यावेळी कांचन गडकरी, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष डॉ. निरुपमा देशपांडे, योगेश बापट, डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे आदी उपस्थित होते.