नागपूर : ९ मे २०१२, नागपूरमधील कळमन्यात चोर समजून नाथजोगी समाजातील तिघांची संतप्त जमावाने हत्या केली. १ एप्रिल २०१८ मध्ये राईनपाडा (धुळे जिल्हा) चोरीच्या संशयावरूनच पाच जणांची हत्या. लोकसंतापाला बळी पडलेले सर्व रोजगारासाठी गावोगावी भटकणारे भटके, विमुक्त समाजाचे नागरिक होते. आता पुन्हा मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवांचे गावोगावी पेव फुटले. त्यामुळे संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी विखुरलेला हा समाज सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे.  

‘आम्हीही माणसेच आहोत, जगण्याचा अधिकार आम्हालाही आहे’ असा टाहो फोडत भटक्या विमुक्तांनी विदर्भातील वाशीम जिल्ह्यात मोर्चा काढला व या समाजाला संरक्षण देण्याची मागणी केली. इतर जिल्ह्यांमधूनही अशीच मागणी आता होऊ लागली असून यानिमित्ताने या सामाजाचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

दरम्यान, सध्या समाजमाध्यमांवर मुले पळवणारम्ी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा जोरात आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी सर्वच ठिकाणी केले असले तरी समाजमाध्यमांवरील व्हिडीयोमुळे पालकांमध्ये जसे भीतीचे वातावरण आहे तसेच व त्यापेक्षा अधिक  भयभीत आहे तो रोजगारासाठी गावोगावी भटकणारा भटके विमुक्त समाज. या समाजासाठी संघर्ष करणाऱ्या ‘संघर्षवाहिनी’ संघटनेचे संयोजक मुकुंद अडेवार म्हणाले, भटक्या विमुक्त समाजामध्ये नाथजोगी, गोंधळी, भुत्या, वाघ्या, मुरळी, भराडी, पोतराज, पारधी व अन्य समाजाचा समावेश आहे. रोजगारासाठी हा समाज कायम स्थलांतरण करतो. अनेकदा अफवांमुळे लोक त्यांना मारहाण करतात. यातूनच नागपूर धुळे जिल्ह्यातील घटना घडल्या. या समाजाची भटकंती थांबवण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे. अडेवार म्हणाले, राज्य शासनाने भटक्या विमुक्तांसाठी लागू केलेल्या योजनांचा त्यांच्याकडे जातीचा दाखलाच नसल्याने फायदा मिळत नाही. शासनाने त्यांच्यासाठी घरकूल योजना जाहीर केली. पण फक्त दोनच गावांना त्याचा फायदा मिळाला यावरून हा समाज  किती दुर्लक्षित आहे, हे स्पष्ट होते.

‘आज इथे, तर उद्या तिथे’

विदर्भात बुलढाणा, वाशीम, नागपूर या जिल्ह्यात नाथजोगीसह भटक्या विमुक्तांमध्ये येणाऱ्या विविध जाच्या लोकांचे वास्तव्य अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातील उदासा या गावात नाथजोगींची वस्ती होती. पण ते गाव आता ओस पडले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अख्खे कुटुंब सोबत घेऊन या समाजाची पावले ‘आज इथे, तर उद्या तिथे’ अशीच आजतागायत भटकत आहेत. परिस्थितीनुसार आजही अनेक समाजबांधव पाडय़ात, पालात राहतात. मात्र, शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने अनेक सामाजिक समस्यांचा घेरा या समाजाभोवती अधिकच घट्ट झाला आहे.