बंडखोरी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेऊनही शिवसेना आणि भाजपच्या इच्छुकांनी परस्परांसाठी सोडलेल्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरले आहेत. आघाडीत काँग्रेससाठी सुटलेल्या जागेवर राष्ट्रवादीनेही उमेदवार देऊन घोळ केला.

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. २०१४ मध्ये सेना आणि भाजप स्वतंत्र लढले. भाजपने ४४ तर सेनेने ४ जागा जिंकल्या. भाजपने जिंकलेल्या जागांमध्ये २००९ मध्ये सेनेने जिंकलेल्या काही जागांचा समावेश होता. काही ठिकाणी सेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. २०१९च्या निवडणुकीसाठी ज्या पक्षाकडे जी जागा आहे ती कायम ठेवायची असे सूत्र जागावाटपात ठरल्याने सेनेवर अन्याय झाला व त्यातून मोठय़ा प्रमाणात भाजपसाठी सोडलेल्या जागांवर सेनेच्या इच्छुकांनी अर्ज भरल्याचे दिसून येते.

पश्चिम विदर्भातील वाशीम मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. युतीत याही वेळी तो भाजपसाठी सुटला. भाजपने येथे विद्यमान आमदार लखन मलिक यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे नीलेश पेंढारकर यांनी अर्ज भरला. पेंढारकर हे २०१४ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमाकांवर होते. बाळापूर मतदारसंघ सेनेसाठी सुटला तेथे भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी अर्ज भरला. रिसोडची जागा सेनेकडे असताना तेथेही भाजपचे माजी आमदार विजय जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला. यवतमाळमध्ये २०१४ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी भाजप विरुद्ध बंड केले. वणीत भाजपचे विद्यमान आमदार बोदकुरवार यांच्या विरुद्ध सेनेचे विश्वास नांदेकर यांनी अर्ज भरला.

नागपूर जिल्ह्य़ात रामटेक मतदारसंघ भाजपकडे आहे. तेथे  आमदार मल्लिकार्जुन रेडी यांना पक्षाने उमेदवारी दिली असताना सेनेचे माजी आमदार आशीष जयस्वाल यांनी येथे बंड केले आहे. असाच प्रकार दक्षिण नागपूरमध्येही घडला. ही जागा भाजपकडे आहे. येथून पक्षाने मोहन मते यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे नगरसेवक व माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांनी अर्ज भरला. ते या मतदारसंघातून यापूर्वीही सेनेच्या तिकिटावर लढले होते.

हिंगणाघाटमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या जागेवरून शिवसेनेचे अशोक शिंदे तीनदा निवडून आल्याने त्यांच्यासाठी ही जागा सोडावी अशी मागणी सेनेने भाजपकडे केली होती. मात्र ती मान्य न झाल्याने अखेर शिंदे यांनी बंड केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आघाडीत विसंवाद : काँग्रेस-राष्ट्रवादीचा बी-फॉर्मचा घोळ पूर्व विदर्भातील काही मतदारसंघात गाजला. राष्ट्रवादीसाठी सुटलेल्या अहेरी मतदारसंघात काँग्रेसनेही त्यांचा उमेदवार जाहीर केला. बल्लारपूर व अहेरी मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने प्रथम महेश मेंढे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर किशोर जोरगेवार यांचे नाव घोषित करण्यात आले. शेवटी मेंढेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील असे सांगण्यात आले.