कौशल्य विकास व रोजगार विभागाचा मात्र यशाचा दावा

नागपूर : बेरोजगारांना रोजगार संधी प्राप्त व्हावी म्हणून करोनाकाळापासून राज्याच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाने सुरू केलेल्या प्रयत्नाला यश येत असले तरी यातून विदर्भाच्या वाटय़ाला  येणाऱ्या रोजगार प्राप्तीचे प्रमाण इतर विभागाच्या तुलनेत नगण्य स्वरूपाचे आहे.

करोना संकट व टाळेबंदीमुळे राज्यात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली होती. यादरम्यान कौशल्य विकास व रोजगार विभागाने  बेरोजगारांना रोजगारप्राप्तीसाठी उमेदवार, उद्योजक व विविध कंपन्या यांच्यात सांगड घालण्याचे काम केले. याच माध्यमातून २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा विभागामार्फत करण्यात आला.

यंदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये विभागामार्फत राज्यात विविध कंपन्या, उद्योगांमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार देण्यात आला. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ७ हजार ६८६, नाशिक विभागात ४ हजार ००४, पुणे विभागात ४ हंजार ७४२, औरंगाबाद विभागात २ हजार ३७४, अमरावती विभागात ४८४ तर नागपूर विभागात ३५८ बेरोजगाराचा समावेश आहे. तत्पूर्वी रोजगार प्राप्तीसाठी झालेल्या नोंदणीचा विचार करता ऑक्टोबर २०२१ मध्ये विभागाकडे ५१ हजार ८६२ उमेदवारांनी नव्याने किंवा पुन्हा नोंदणी केली होती. यात मुंबई विभागातून ११,६९५, नाशिक-९,३९३, पुणे-१३,९८४, औरंगाबाद-८,६७२,अमरावती-५०७१ व नागपूर विभागातील ३,०४७ नोकरी इच्छुकांचा समावेश होता.

विभागनिहाय नोंदणी व रोजगार प्राप्तीचे प्रमाण लक्षात घेतले तर मुंबई (६५.६२ टक्के), नाशिक(४२.६२ टक्के), पुणे ( ३३.९१ टक्के) या औद्योगिकदृष्टय़ा प्रगत विभागात अधिक असून या तुलनेत विदर्भातील अमरावती (९.५४टक्के) व नागपूर (११.७४ टक्के) विभगात हे प्रमाण नगण्य स्वरूपाचे असल्याचे आकडेवारी दर्शवते. या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी मात्र कौशल्य विकास विभागाचे उपक्रम नोकरी मिळवण्यासाठी चांगले व्यासपीठ ठरल्याचा दावा केला  आहे. यासंदर्भात कौशल्य विकास व रोजगार नागपूर विभागाचे सहसंचालक  प्रभाकर हरडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ते अभ्यास दौऱ्यावर असल्याचे सांगितले.