शफी पठाण, लोकसत्ता

नागपूर : ‘‘मला माझे अस्तित्व हे अनेकदा दोन टोक असलेल्या पेन्सिलसारखे भासते.. मी दोन भाषांमध्ये लिहिणारा एक कवी आहे की माझ्याच आत दोन भिन्न भाषांमध्ये लिहिणारे दोन कवी आहेत मला हे ज्ञात नाही.. पण, या द्वैभाषिक ‘सीमावादा’च्या द्वंदात माझी कविता कधी अडकू नये, हीच माझी इच्छा आहे..’’ असे प्रसिद्ध कवी अरुण कोलटकर नेहमी सांगायचे. तरीही, द्वैभाषिकतेच्या द्वंदाचे ग्रहण त्यांना त्यांच्या हयातीत सोडवण्यात फारसे यश आले नाही.

पण, नागपुरातील विदर्भ साहित्य संघाने कोलटकरांच्या मृत्यूनंतर का होईना त्या दिशेने एक आश्वासक पाऊल पडले आहे. साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या वाङ्मयीन त्रमासिकाच्या विशेषांकात खूप काही लिहूनही बऱ्यापैकी अव्यक्त राहिलेल्या कोलटकरांच्या द्वैभाषिक अभिव्यक्तीचे नवेकोरे रूप वाचकांना अनुभवता येणार आहे.

पूर्ण वर्षभर  विशेषांकाचे काम सुरू होते. मधल्या काळात साहित्य संघाची अनेक त्रमासिके येऊन गेली. पण, कोलकटरांच्या विशेषांकासाठी अद्याप त्यांच्या खडर्य़ातच राहिलेला ‘ऐवज’ मिळवण्याची धडपड काही संपेना. अखेर वर्षभराच्या धडपडीनंतर हा विशेषांक सज्ज झाला आहे.

 ‘जेजुरी’ ते ‘द्रोण’ अशी कोलटकरांच्या कवितेतील स्थित्यंतरे, त्यांच्या कवितांचा स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन व इंग्रजीत झालेला भाषांतराचा प्रवास, कोलटकरांच्या ‘सर्पसत्र’चा गुजराती अवतार, अशी वाचनीय मैफल या अंकाच्या पानापानावर वाचकांना अंतर्मूख करणारी आहे. या विशेषांकात साहित्याच्या पूर्वसंस्कारांना हादरवणारा एक भागही आहे. तो म्हणजे, ‘बळवंतबुवा’ या अप्रकाशित कादंबरीतील सुरुवातीची काही पाने. वर्तमान सामाजिक स्थितीची भीषणता यात खूपच दाहकतेने व्यक्त झाली आहे. याशिवाय प्रल्हाद जाधव, संदेश भंडारी यांनी काढलेली कोलटकरांची छायाचित्रे वाचकांसाठी सर्वार्थाने नवीन आहेत. १८४ पानांच्या या व्यापक शब्दसंघटनाचे आव्हान एकहाती पेलणारे प्रफुल्ल शिलेदार यांच्या संपादनात हा विशेषांक सिद्ध झाला आहे. तो कोलटकरांच्या प्रतिभेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल, इतकी त्याची वाङ्मयीन उंची नक्कीच आहे.

विशेषांकात काय?

समग्र कोलकटर संबोधता येईल, असा हा अंक आहे. अरुण खोपकर, चंद्रकांत पाटील, वृंदावन दंडवते, वसंत गुर्जर, सुधीर रसाळ, अशोक शहाणे, अरिवद मेहरोत्रा, अंजली नेर्लेकर, ग्युन्थर झोंथायमर या सिद्धहस्त लेखकांनी कोलटकरांच्या प्रतिमांकित भावकवितेच्या तळापर्यंत वाचकांना पोहोचता येईल, इतकी विस्तृत मांडणी यात केली आहे.

नव्या पिढीच्या आकलनासाठी..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ध्वनिसूचक शब्दांच्या अर्थशक्तीचा प्रभावी वापर करून सभोवतालच्या वास्तवाचे भावचित्र आपल्या कवितांमधून मांडणारे कोलटकर वाचकांना कायम एका न सोडवता येणाऱ्या कोडय़ासारखेच क्लिष्ट वाटत राहिले. ही क्लिष्टता दूर व्हावी आणि नव्या पिढीला कोलटकर नव्याने कळावे, या कळकळीतून विदर्भ साहित्य संघाने या विशेषांकाची योजना केली आहे.