रेल्वे प्रशासनाच्या परस्परविरोधी नियमांचा प्रवाशांना फटका
‘प्रतीक्षा यादीवरील’ तिकीटधारकाला रेल्वेच्या आरक्षित डब्यात विनातिकीट प्रवासी मानावे, असा रेल्वेचा नियम असताना दुसरीकडे २०० कि.मी. अंतरापर्यंत ‘प्रतीक्षा यादीवरील’ तिकिटांची विक्री करावी, असा नियम. या परस्परविरोधी नियमांमुळे रेल्वेच्या गल्ला तर भरतोच भरतो, पण तिकीट तपासणीसांनाही खिसा भरण्याची आयती संधी उपलब्ध करून दिली जाते.
रेल्वेच्या आरक्षित डब्यामध्ये ‘प्रतीक्षायादी’ वरील तिकीटधारकांना प्रवेश नाही. आरक्षित तिकीटासाठीचे पूर्ण शुल्क भरून तिकीट घेतले तरीसुद्धा अशा प्रवाशांना विनातिकीट किंवा अनधिकृत प्रवासी समाजण्यात येते. यामुळे असा प्रवासी आरक्षित डब्यात बसल्यास २५० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. अनेकदा याच नियमाचा धाक दाखवत तिकीट तपासणीस अशा प्रवाशांकडून काही पैसे घेत स्वत:चा खिसा भरतात.
शयनकक्ष असलेल्या डब्यासाठी २०० कि.मी. अंतरापर्यंत प्रतीक्षा यादीवरील तिकीट देण्याचा जसा नियम आहे तसेच प्रतीक्षा यादीवरील तिकीट विक्रीवरही काही र्निबध नाहीत. उन्हाळ्याच्या वा इतर सुटय़ांच्या दिवसात प्रतीक्षा यादी ४००च्या वर जात असते. अशावेळी तिकिटांच्या माध्यमातून कोटय़वधी रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा होतात.
‘आरक्षणमान्य’ तिकीट असलेल्या प्रवाशांच्या बरोबरीने तिकिटाची रक्कम ‘प्रतीक्षा यादीवरील’ तिकीट धारकांनीही भरलेली असतानाही त्यांना डब्यात चढता येत नाही आणि डब्यात चढल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. अशी तिकिटे असणारे आरक्षित डब्यात अनधिकृत ठरत असतील तर असा तिकिटांची एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर विक्रीच का केली जाते, असा सवाल उपस्थित होतो.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २०१५-२०१६ या आर्थिक वर्षांत तिकीट तपासणीतून १३.६२ कोटी रुपये गोळा केले आहेत. यातील बहुतांश रक्कम ही तिकीट तपासणी अभियानात अनधिकृत प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाची असते. रेल्वेच्या लेखी, विनातिकीट प्रवास करणारा, प्रतीक्षा यादीवरील तिकीट असताना आरक्षित डब्यातून प्रवास करणारा आणि जनरल तिकीट असताना शयनकक्ष असलेल्या डब्यातून प्रवास करणारा असे सर्व प्रवासी अनधिकृत ठरतात. जनरल डब्यात पाय ठेवायला जागा नाही आणि ऐनवेळी आरक्षित तिकीट मिळणे शक्य नाही म्हणून अनेकजण जनरल बोगीचे तिकीट घेऊन शयनकक्ष डब्यातून प्रवास करतात.
तिकीट तपासणीस अशा प्रवाशांकडून तिकिटाच्या किंमतीमधील फरक आणि किमान अडीचशे रुपये दंड आकारून पावती बनवून देतो. सोबतच शयनकक्षाच्या ज्या डब्यात जागा असेल त्यात चढायचा सल्ला देतो. तिकीट तपासणी अभियानात देखील अशाच प्रकारे दंड आकारण्यात येतो. प्रवाशांना शयनकक्ष डब्यात प्रवेश मिळतो, पण त्यात झोपायला तर सोडाच बसायला सुद्धा जागा मिळेल की नाही याची शाश्वती नसते.
प्रवाशाला त्यांच्या पातळीवर तडजोड करून प्रवास करण्याचा सल्लाही दिला जातो. यामुळे ७२ आसन क्षमता असलेल्या शयनकक्ष डब्यात दीडशेहून अधिक प्रवासी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
रेल्वेचे तिकीट खिशात असताना अनधिकृत प्रवाशाचा शिक्का घेऊन आणि दंड भरून असे हजारो प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात. यामुळे रेल्वेचा गल्ला आणि तिकीट तपासनीसाचा खिसा भरत असला तरी प्रवाशांची मात्र लूट आणि भयंकर हाल होतात.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2016 रोजी प्रकाशित
‘प्रतीक्षा यादी’ रेल्वे तिकिटांतून प्रवाशांची लूट
उन्हाळ्याच्या वा इतर सुटय़ांच्या दिवसात प्रतीक्षा यादी ४००च्या वर जात असते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-04-2016 at 04:23 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wait list passengers paid fine for travelling in reserved coaches